For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

20 व्या शतकात लोकशाही विस्तारली

11:22 AM Apr 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
20 व्या शतकात लोकशाही विस्तारली
Advertisement

ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार यांचे प्रतिपादन

Advertisement

बेळगाव : लोकशाहीची जननी मानल्या जाणऱ्या आपल्या देशात 20 व्या शतकात लोकशाही हळूहळू विस्तारू लागली. मात्र, स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतरच्या लोकशाहीत बरीच तफावत दिसून आली. 1990 ते 2010 हा काळ लोकशाहीसाठी उत्तम काळ होता. मात्र, लोकशाहीची मूल्ये टिकत नसतील तर देशाची वाटचाल चुकीच्या दिशेने होते, याची जाणीवही झाली. अलीकडच्या लोकांनी राजकीय चळवळीतून लोकशाहीची मूल्ये ठरविली आहेत, असे उद्गार कोल्हापूर येथील ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार यांनी काढले. प्राचार्य एस. वाय. पाटील पुरोगामी सेवा दल बेळगाव यांच्या 17 व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात ते ‘भारतीय लोकशाहीची वाटचाल’ या विषयावर बोलत होते. व्यासपीठावर प्राचार्य आनंद पाटील, सह्याद्री सोसायटीच्या सुजाता मायाण्णाचे, अंनिसचे एस. पी. चौगुले आदी उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. प्रा. सुरेश पाटील यांनी प्रास्ताविक केले. वाय. बी. पवार यांनी परिचय करून दिला. प्रा. आनंद पाटील यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.

पवार पुढे म्हणाले, देशात स्वातंत्र्यपूर्व काळात लोकशाही चालविणे अवघड होते. आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या देशाला लोकशाहीच्या मार्गाने नेणे कठीण होते. अशा विविध संकटात सापडलेला देश लोकशाहीच्या दिशेने कसा जाणार, असा प्रश्नही त्या काळी निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत देश स्वतंत्र झाला आणि देशाने आज लोकशाहीची 75 वर्षे पूर्ण केली आहेत. 90 च्या काळात सेवा क्षेत्रात अधिक बदल झाले. याचा परिणाम ग्रामीण व्यवस्थेवर झाला. सेवा क्षेत्रात वाढ झाल्याने ग्रामीण भागातील तरुण शहराकडे वळू लागला आणि एक मोठा वर्ग शहराकडे स्थलांतरीत होऊ लागला. संसद, न्यायालय या व्यवस्थेचा एकमेकांवर अधिकार असला पाहिजे. यामुळे हुकूमशाही रुजविण्याचे धाडस होणार नाही, असेही त्यांनी बोलताना स्पष्ट केले. यावेळी प्रा. सुरेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले. जी. एस. पाटील यांनी आभार मानले. याप्रसंगी प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.