महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लोकशाही-सामान्य माणसाच्या निर्णय क्षमतेवरील विश्वास- - ज्येष्ठ विचारवंत अभय भंडारी

06:49 AM Sep 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आज लोकशाही दिन असून राज्य सरकारने सर्व जिल्ह्यांमध्ये मानवी साखळीचे आयोजन केले आहे. या मानवी साखळीमुळे माणसे परस्परांना जोडली जातील आणि लोकशाही अधिक बळकट करण्याचा निर्धारही अधोरेखित होईल, त्यानिमित्त...

Advertisement

लोकशाही व्यवस्थेत राज्यकर्ते समाजाने निवडून दिलेले असल्याने ते समाजाच्या आशा, आकांक्षा, दुर्बलता आणि बलस्थाने, गुण आणि दोष यासह सामाजिक जाणीवेचा आरसाच असतात.

Advertisement

समाजाची सुरक्षा, प्रत्येकाला विकासाची संधी, आपापल्या क्षेत्रात गुणवत्ता संपादन करण्यासाठी अनुकूल वातावरण, प्रत्येकाला उत्तम शिक्षण, आरोग्य, समृद्ध पर्यावरण मिळावे यासाठी कर्तव्यतत्पर व्यवस्था, प्रामाणिक लोकांना निर्भयतेने उत्कृष्ट काम करण्याचे स्वातंत्र्य, समाजकंटकांवर कायद्याचा धाक, वेगवान, नि:पक्षपाती न्यायाची शाश्वती, व्यक्ती, समाज आणि संपूर्ण देशाची सर्वांगीण भरभराट, प्रत्येकाला आत्मसन्मान आणि सर्व सरकारी व्यवस्थांचे समाजाप्रती असणारे उत्तरदायित्वाचे भान असणे, ही एका उत्तम लोकशाहीची चौकट आहे, असे म्हणता येईल.

मनुष्य जीवन न्यायनीतीला धरून असेल तर समाज सुखी

सामान्य मनुष्याचे जीवन प्रभावित करणारे अर्थकारण, राजकारण, समाजकारण, सांस्कृतिक वातावरण, हे सारे न्यायनीतीला धरून असेल तर समाज सुखी होतो. लोकशाही उन्नत होण्यासाठी ती ज्या पायावर उभी असते, तो पाया अगदी भक्कम हवा. कोणतीही इमारत भुसभुशीत पाया असेल तर दीर्घकाळ टीकणार नाही. अगदी तशीच आपली लोकशाही व्यवस्था स्थिर, सुदृढ, निकोप असण्यासाठी तिचा आधार असणारा मतदार प्रगल्भ हवा. मतदार जे लोकप्रतिनिधी निवडून देतो, ते गुणवान, चारित्र्य संपन्न, राष्ट्रनिष्ट, संवेदनशील, सुसंस्कृत असतील तर त्यांनी चालवलेल्या व्यवस्था सर्व अर्थाने कल्याणकारी असतीलच.

सामान्य माणूस जेव्हा आपल्या वैयक्तिक स्वार्थाला राष्ट्र हितापेक्षा जास्त महत्त्व द्यायला लागतो, तेव्हा लोकप्रतिनिधी निवडून येण्यासाठी मतदारांवर सवलतींची खैरात वाटतात.त्यांना व्यवस्थांच्या गुणदोषांची काळजी करणं, त्या सुधारणं, त्यासाठी वेळ देणं, मूलभूत चिंतन करणं, हे सारं अनावश्यक वाटायला लागतं.ते फक्त लोकानुनय करतात आणि निवडून येतात.

यातूनच लोकशाहीतील भ्रष्टाचार, सामाजिक दुर्व्यवहारांना सुऊवात होते. याला वेळीच आळा घालून प्रसंगी लोकांना योग्य तिथे फटकारून लोकांना न आवडणारे पण त्यांच्या अंतिम हिताचे निर्णय धाडसाने घेण्याचा विवेक राज्यकर्त्यांनी दाखवला,तर लोकशाही अधिक सक्षम होते. समाजमन नेहमीच अनेक भावभावनांनी आंदोलित होत असतं.अशा स्थितीत समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रगल्भ व्यक्तींशी विचार विनिमय करून राजसत्तेला दिशा ठरवायला लागते.

...तर राज्य संकटात

सामान्य मनुष्याला अज्ञात असणाऱ्या अशा अनेक गोष्टी सरकारी यंत्रणेला प्रभावित करीत असतात. त्यावेळी समाजाने आपल्या राज्यकर्त्यांवर विश्वास ठेवावा. जनमत सतत दोलायमान असेल, तर राज्यकर्ते कोणताही देशहिताचा निर्णय ठामपणे घेऊ शकणार नाहीत. ते लोकांचा भावनिक कल पाहून लोकप्रिय निर्णय घेतील, तर पुढे असे राज्य संकटात सापडल्याशिवाय राहणार नाही.

राज्यकर्ते समाजातील सामान्य मनुष्यापेक्षा जास्त प्रगल्भ हवेत. तसे राज्यकर्ते घडवण्यासाठी एक सुनियोजित व्यवस्था हवी.त्यातून जे लोक घडवले जातील, त्यांना जीवनातील अनेक गोष्टींचे चांगले आकलन असावे लागेल, समाजमन समजावे लागेल, समाजाला त्याच्या हिताच्या दिशेने पुढे नेताना असे निर्णय का घेतले, याचे नीट विवरण करून सांगण्याचा आत्मविश्वासही हवा.

या लोकप्रतिनिधींपलिकडे असलेले प्रशासन, न्यायव्यवस्था, पत्रकारिता या तीन स्तंभांकडेही नीट लक्ष देऊन त्या त्या व्यवस्था अधिकाधिक विश्वसनीय, कार्यक्षम, पारदर्शक व दर्जेदार होण्यासाठी तसे मनुष्यबळ आपल्याला शिक्षणातून घडवावे लागेल. शिक्षणाचा उद्देश गुणवत्ता, चारित्र्य, निर्भयता, नीतिमत्ता संपादन करण्याचा हवा. कोणताही समाज जेव्हा दिशाहीन होऊन भरकटत जातो, तेव्हा निश्चित समजा, की त्या समाजात गुणवान चारित्र्यसंपन्न लोकांचे दुर्भिक्ष्य आहे, किंवा त्या समाजाला गुणवत्ता आणि चारित्र्याची यत्किंचितही चाड नसल्याने तो समाज गुणवान, विश्वसनीय लोकांना जाणीवपूर्वक बाजूला ठेवून सुमार लोकांच्या हाती व्यवस्था सोपवतो आहे.

कोणत्याही मनुष्याची एखादी अगदी क्षुल्लक वाटणारी सकारात्मक कृती समाजाला त्या प्रमाणात उन्नत करते, लोकशाही बळकट करते, तसेच कोणतीही अगदी सामान्य नकारात्मक कृती त्या प्रमाणात समाजाचे नुकसान करून लोकशाहीचे खच्चीकरण करते.

लोकशाही बळकटीसाठी सुरेख मेळ आवश्यक

सूर्य प्रकाशात सप्तरंग असतातच, पण ते एरवी कधीही न दिसता फक्त इंद्रधनुष्यात हवा, आर्द्रता, प्रकाशकिरणांचा योग्य कोन साधला, की अगदी मनोहर दृष्य दिसते. अगदी तशीच आपली लोकशाही बळकट, प्रगल्भ, सर्वहिताकांक्षी कल्याणकारी होण्यासाठी मनुष्य आणि त्याच्यासाठी रचना केलेल्या सर्व संविधानिक व्यवस्था यांच्यात एखाद्या सुरेल मैफलीतील गायन आणि वादनासारखा सुरेख मेळ साधला पाहिजे.

आपले आजचे जीवन कालच्यापेक्षा एकेका पायरीने उन्नत होण्यासाठी समाजापुढे आदर्शही हवेत. त्यांचे समाजाने अनुसरण करावे यासाठी समाजाला प्रेरीत करावे लागते. यातुनच एखादे महान राष्ट्र उदयास येते, जे प्रदीर्घ काळ संपूर्ण मानवतेला दिशादर्शक ठरते. आपल्या राष्ट्राने सातत्याने लोकशाहीचा पुरस्कार केला आहे. आणि तिचे महत्त्व अबाधित ठेवले आहे. हे महत्त्व लक्षात घेऊन लोकशाही अधिकाधिक बळकट करण्यासाठीची प्रतिज्ञा आजच्या ‘लोकशाही दिना’च्या निमित्ताने आपण पुन्हा घेतली पाहिजे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article