शिवारामध्ये पार्ट्या करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी
बेळगाव : खुल्या ठिकाणी बसून मद्यप्राशन करणाऱ्यांच्याविरोधात पोलिसांनी मोहीम उघडली असली तरीही वडगाव, येळ्ळूर, अनगोळ, शहापूर शिवारात मात्र अद्यापही मद्यपींचा वावर सुरुच आहे. दिवसा तसेच रात्रीच्यावेळी शिवारात ओल्या पार्ट्या सुरू असल्याने खरीब हंगामातील पिकांचे तळीरामांकडून नुकसान केले जात आहे. तसेच दारुच्या बाटल्या शेतात फोडल्या जात असल्याने शेतकऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे शिवारातील मद्यपींचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवारात पार्ट्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. मद्यप्राशन केल्यानंतर काचेच्या बाटल्या तेथेच फोडल्या जातात. सिगारेट ओढून त्यांची थोटकी फेकली जात असल्याने गवतगंजींना आग लागण्याचे प्रकारही घडत आहेत.
केवळ दारुच नव्हे तर गांजासह इतर अंमलीपदार्थांचे सेवन करून जुगारही खेळला जात आहे. झाडाखाली तेथेच सर्व टाकाऊ फेकून दिले जात आहेत. मद्यपींचा धिंगाणा वाढत चालला असल्याने महिलावर्गामध्ये शेताकडे जाताना भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. सध्या हरभरा, मसूर, काकडी, तूरसह इतर पिकांची चोरी होण्याचे प्रमाणही वाढले आहे. शिवाय वीज मोटारींच्या वायरी व इतर साहित्य चोरुन नेत आहेत. त्यामुळे दररोजच्या प्रकारांना शेतकरी कंटाळले आहेत. खुल्या ठिकाणी बसून दारू, गांजा व इतर अमलीपदार्थ सेवन करणाऱ्यांवर सध्या पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. त्याचप्रमाणे शिवारामध्ये बसून पार्ट्या व नशा करणाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.