अय्यप्पा यात्रेसाठी बेळगावमधून एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी
राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांना निवेदन
बेळगाव : बेळगावसह परिसरातून शेकडो भाविक अय्यप्पा यात्रेसाठी शबरीमला येथे जात असतात. केरळ येथील शबरीमला मंदिराला ये-जा करण्यासाठी थेट रेल्वे उपलब्ध नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे बेळगावहून केरळ येथील चेंगनूर शहरापर्यंत थेट रेल्वे सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी भारतीय अय्यप्पा सेवा संघाच्यावतीने शनिवारी राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. बेळगाव तालुक्यासह कुडची, रायबाग, चिकोडी, गोकाक, घटप्रभा, अथणी, खानापूर, बैलहोंगल, सौंदत्ती, रामदुर्ग या परिसरातून शेकडो भाविक शबरीमला येथे दर्शनासाठी जातात. नोव्हेंबर ते जानेवारी या तीन महिन्याच्या कालावधीत यात्रा भरते. या दरम्यान बेळगाव ते चेंगनूर अशी एक्स्प्रेस सुरू केल्यास प्रवाशांची सोय होणार आहे. त्यामुळे राज्यसभा सदस्यांनी या एक्स्प्रेससाठी प्रयत्न करावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी अनंत शेट्टी, मारुती कोळी, अडव्याप्पा जल्लाद, सुरेश तळवार, राघवेंद्र शास्त्राr, महाबळेश्वर मुलीमनी, मल्लिकार्जुन विजापूर, रघु कलपत्रे, सदाशिव हिरेमठ, शिव नवलन्नावर, आनंद नवले यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.