बेळगाव-हैदराबाद एक्स्प्रेस पूर्ववत करण्याची मागणी
कोअर डेव्हलपमेंट सदस्यांचे खासदारांना निवेदन
बेळगाव : बेळगाव-हैदराबाद-भद्राचलम एक्स्प्रेस मागील दोन महिन्यांपासून रद्द करण्यात आली होती.तांत्रिक कारण देत रेल्वेने एक्स्प्रेस बंद केली असली तरी यामुळे बेळगावमधील प्रवाशांची गैरसोय होत आहे. मंत्रालय तसेच हैदराबाद येथे जाणाऱ्या प्रवाशांना इतर एक्स्प्रेस उपलब्ध नसल्याने बेळगाव-हैद्राबाद एक्स्प्रेस पूर्ववत करण्याची मागणी कोअर डेव्हलपमेंट ग्रुपच्यावतीने शुक्रवारी खासदार जगदीश शेट्टर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. रेल्वे समस्येबाबत खासदारांची भेट घेऊन त्यांच्याकडे नवीन एक्स्प्रेसबाबत मागणी करण्यात आली. बेंगळूर-धारवाड वंदे भारत एक्स्प्रेसचा बेळगावपर्यंत विस्तार करावा, या प्रमुख मागणीसह बेळगाव-तिरुपती व बेळगाव-दिल्ली या मार्गावर अतिरिक्त रेल्वे सुरू करावी. बेळगावहून मुंबईसाठी रात्रीची एक्स्प्रेस सुरू करण्याबाबत मागणी करण्यात आली. बेळगावपासून जवळच असलेल्या देसूर रेल्वेस्थानकावर तीन पीटलाईन, तीन स्टॅबलिंग लाईन तसेच दोन अतिरिक्त प्लॅटफॉर्म तयार करण्याची मागणी करण्यात आली. खासदार जगदीश शेट्टर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत विविध रेल्वे मागण्यांसाठी आपण लवकरच रेल्वेमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे सांगितले. यावेळी संजीव जोशी, श्रीधर हुलीकवी, जयसिंग राजपूत, कृष्णा, शैलेश, निखिल पाटील, सतीश दुबई यासह इतर उपस्थित होते.