मराठा कॉलनी वसाहतमधील समस्या सोडविण्याची मागणी
वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक
महानगरपालिका हद्दीतील शाहूनगर वसाहतीला लागून असलेल्या कंग्राळी बुद्रुक ग्राम पंचायत हद्दीतील मराठा कॉलनी वसाहतमधील पथदीप सुरू करणे, जलनिर्मल योजनेंतर्गत खोदाई करून रस्त्याकडेला टाकलेला सिडीचा मोठा काँक्रीट बाजूला करणे, याकडे पीडीओ व सदस्यांनी लक्ष देवून समस्या सोडवाव्यात अशी मागणी करण्यात येत आहे. शाहूनगर हद्दीला लागूनच मराठा कॉलनी ही कंग्राळी बुद्रुक ग्राम पंचायत कार्यक्षेत्रातील वसाहत आहे. कंग्राळी बुद्रुक येथून कंग्राळी खुर्दला जाण्यासाठी मराठा कॉलनी येथूनच जावे लागते. परंतु सदर मुख्य रस्त्यावरील पथदीप कित्येक दिवसांपासून बंद आहेत. रात्रीच्यावेळी अंधाराचे साम्राज्य पसरते. त्यातच जलनिर्मल योजनेसाठी खोदलेले खड्डे आणि वाढलेल्या रहदारीमुळे वाहनधारकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. तेव्हा ग्राम पंचायतीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे त्वरित लक्ष देवून मुख्य रस्त्यावरील समस्या सोडवाव्यात अशी मागणी होत आहे.