हुबळी-लोंढा-मिरज-पंढरपूर रेल्वेसेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी
कारवार : कोविड महामारीमुळे स्थगित करण्यात आलेली हुबळी-लोंढा-मिरज-पंढरपूर रेल्वेसेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी हल्ल्याळ-जोयडाचे आमदार आणि माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांच्याकडे केली आहे. मंत्री सोमण्णा दांडेलीच्या दौऱ्यावर आले असताना देशपांडे यांनी सोमण्णा यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, कोविडमुळे हुबळी-पंढरपूर रेल्वे सेवा ठप्प झाल्याने उत्तर कर्नाटकवासियांची आणि असंख्य विठ्ठल भक्तांची गैरसोय होत आहे. कोविडपूर्वी हुबळी-लोंढा-मिरज-पंढरपूर ही रेल्वे नियमितपणे धावत होती. या रेल्वे मार्गावरील उत्तर कर्नाटकातील भाविकांची, विद्यार्थ्यांची आणि व्यापाऱ्यांची फार मोठी सोय होत होती.
पंढरपुरातील विठोबाच्या दर्शनासाठी धाव घेणाऱ्या लाखो भक्तांच्या दृष्टीकोनातून ही रेल्वे महत्त्वाची भूमिका बजावत होती. ही रेल्वेसेवा ठप्प झाल्यामुळे विठ्ठल भक्तांची फार मोठी गैरसोय होत आहे. निवेदनात देशपांडे यांनी पुढे असे म्हटले आहे की, ही रेल्वेसेवा पुन्हा सुरु केल्यास पंढरपुरात नियमितपणे आणि यात्रा उत्सवांना दाखल होणाऱ्या हजारो भक्तांना लाभदायक ठरणार आहे. शिवाय या रेल्वेसेवेमुळे कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांचा संपर्क उत्तमरित्या साधला जाणार आहे. इतकेच नव्हे तर दोन्ही राज्यातील पर्यटन आणि लघू व्यापाराला या रेल्वेमुळे उत्तेजन मिळणार आहे. त्याकरिता मंत्री सोमण्णा यांनी अनेकांच्या मागणीची आणि गरजेची दखल घेऊन, रेल्वे खात्याच्या वरिष्ठांना सूचना कराव्यात आणि हा रेल्वे प्रवास पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे पुढे देशपांडे यांनी निवेदनात म्हटले आहे.