आझाद गल्लीतील मातीचे ढिगारे हटविण्याची मागणी
बेळगाव : एलअॅण्डटी कंपनीकडून शहर व उपनगरात जिकडे तिकडे खोदकाम हाती घेण्यात आले असल्याने याचा मनस्ताप सहन करण्याची वेळ बेळगावकरांवर आली आहे. रंगपंचमीपूर्वी आझाद गल्लीतील मातीचे ढिगारे हटवून व्यवस्थितरित्या चरी बुजविण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत रंगपंचमी दोन दिवसावर येऊन ठेपली असतानाही मातीचे ढिगारे हटविले नाहीत. त्यामुळे रहिवाशांतून एलअॅण्डटीच्या मनमानीबाबत संताप व्यक्त होत आहे. जलवाहिनी घालण्यासाठी मनमानी पद्धतीने खोदकाम केले जात आहे. त्यामुळे सर्वत्र धुळीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जलवाहिनी घालण्यात आल्यानंतर चरी व्यवस्थितरित्या बुजविणे आवश्यक आहे. मात्रा घाईगडबडीने चरी बुजविण्याचे प्रकार सुरू आहे. यासाठी काही दिवसांपूर्वी नगरसेवक शंकर पाटील यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या एलअॅण्डटी कंपनीकडून चरी बुजविण्याचे काम हाती घेतले. पण आता पुन्हा येरे माझ्या मागल्या झाले आहे. धूळ उडू नये यासाठी टँकरद्वारे पाण्याची फवारणी केली जात आहे. पण त्याचा म्हणावा तसा फायदा होताना दिसत नाही. बेळगाव शहर आणि तालुक्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात रंगपंचमी साजरी केली जाते. त्यामुळे रंगपंचमीपूर्वी आझाद गल्लीतील मातीचे ढिगारे हटविण्यात यावेत, अशी मागणी गल्लीतील रहिवाशांनी केली होती. पण अद्यापही त्याकडे लक्ष देऊन ढिगारे हटविले नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.