शेतकरी हुतात्मा दिनाचे आचरण करण्याची मागणी
बेळगाव : शेतकऱ्यांकडून आपल्या विविध मागण्यांसाठी अनेक आंदोलने, मोर्चे काढण्यात येतात. तसेच समस्यांचे निराकरण होत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपल्या प्राणांची अहुती दिली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन स्तरावर 21 जुलै रोजी शेतकरी हुतात्मा दिन आचरण करण्यात यावा. तसेच राज्य सरकारने म्हादई योजना अमलात आणावी, अशी मागणी शेतकरी महासंघाच्यावतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन प्रादेशिक आयुक्तांना देण्यात आले. म्हादई योजना अमलात आणण्याच्या मागणीसाठी 21 जुलै रोजी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हुबळी येथील निवासस्थानासमोर बैठक आयोजित करण्यात येणार आहे. तसेच प्रल्हाद जोशी यांच्याकडून ठोस आश्वासन घेऊनच बैठक आटोपती घेण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा व पोलीस प्रशासनाने सहकार्य करण्याचे आवाहन निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आले. यावेळी बिराप्पा देशनूर, शंकर अंबली, बसवराज मोकाशी, दिनेश पाटील, गणेश इळीगेर यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.