बिगरहुकूम शेतकऱ्यांना हक्कपत्र देण्याची मागणी
बेळगाव : जिल्ह्यासह राज्यातील लाखो शेतकरी सरकारी जमिनीवर शेती करत आहेत. ते गेल्या 60 ते 70 वर्षांहून अधिक काळ या जमिनींवर पिके घेऊन उदरनिर्वाह करत आहेत. उपजीविका मिळविण्यासोबतच संपूर्ण समाजाची भूक भागविण्यातही त्यांची मोठी भूमिका आहे. राज्य सरकारने या जमिनीचे हक्कपत्र बिगर हुकूम शेतकऱ्यांना देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र याबाबत कोणतीही पावले उचलली जात नसून लवकरात लवकर जमिनीचे हक्कपत्र देण्याची मागणी अखिल भारतीय शेतकरी कृषी कामगार संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.
निवेदनात, शेतकरी आपली जमीन कसून मानवजातीला अन्न पुरविण्याचे काम करतो. गेल्या अनेक वर्षांपासून लाखो शेतकरी सरकारी जमिनीवर शेती करून उपजीविका चालवत आहेत. मात्र आता सर्व्हेचे काम हाती घेण्यात आले असून अधिकारी शेतकऱ्यांना जमीन सोडून देण्याची सूचना करत आहेत. यामुळे आपल्यावर अन्याय होत असून शेती गेल्यास आम्ही रस्त्यावर येणार आहोत. यामुळे बिगर हुकूम शेतकऱ्यांना तात्काळ मालकी हक्कपत्र देण्यात यावेत. तसेच जमीन वाटप समिती स्थापन करून शेतकऱ्यांना नोटिसा पाठविणे बंद करण्याची मागणीही करण्यात आली.