ज्येष्ठ रेल्वे प्रवाशांसाठीचे वाहन वापरात आणण्याची मागणी
व्यवस्थापनाने प्रवाशांच्या सोयीकडे द्यावे लक्ष
बेळगाव : बेळगाव रेल्वेस्थानकावर फूटओव्हरब्रिज स्थानकाच्या एका बाजूला असल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना ये-जा करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहन रेल्वेस्थानकाला देण्यात आले आहे. परंतु, अद्याप हुबळी येथून वाहनचालकाची नेमणूक झाली नसल्याने हे वाहन वापराविना तसेच पडून आहे. वर्षभरापूर्वी हुबळी व बेळगाव रेल्वेस्थानकांना इलेक्ट्रिक वाहने देण्यात आली. त्यानंतर वयोवृद्ध प्रवाशांना ये-जा करण्यासाठी या वाहनाचा वापर होत होता. परंतु, काही महिन्यांपूर्वी हुबळी येथे इलेक्ट्रिक वाहन नियंत्रण सुटल्याने थेट रेल्वेरुळावर जाऊन पडले. यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव नैर्त्रुत्य रेल्वेने ही सुविधा तात्पुरती थांबवली होती. त्यामुळे बेळगावमधील इलेक्ट्रिक वाहन पुन्हा हुबळीला नेण्यात आले. नैर्त्रुत्य रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य प्रसाद कुलकर्णी यांच्या प्रयत्नाने इलेक्ट्रिक वाहन चार दिवसांपूर्वी पुन्हा बेळगावला आणण्यात आले. परंतु, या वाहनासाठी अद्याप प्रशिक्षण घेतलेला चालक उपलब्ध झालेला नाही. हुबळी येथून चालकाची नेमणूक केली जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी इलेक्ट्रिक वाहन वापरात आणण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.