वडगाव-यरमाळ रस्त्यावर बसफेऱ्या वाढविण्याची मागणी
► प्रतिनिधी/ बेळगाव
वडगावपासून बळ्ळारी नाला अलीकडे, वडगाव पलीकडे शहापूर, वडगाव, धामणे, येळ्ळूर, मासगौंडहट्टी अशी हजारो एकर शेती आहे. वडगाव, शहापूर शिवारातील शेतजमीन ही शहरी भागातील शेतकऱ्यांची आहे. शेतकरी व महिला दररोज शेतात जात असतात.
महागाईत शेतकऱ्यांना शेती करणे जिकीरीचे होऊन बसले आहे. अनेकांनी तर पीककर्ज घेऊन पेरलेली भातपिके गेल्याने शेतात पुन्हा भात लावणी केली. त्यासाठी दुसरा भुर्दंड बसला आहे. तरी संबंधित बसडेपो अधिकाऱ्यांनी वडगाव-यरमाळ रस्त्यावर मासगौंडहट्टीची जनता व विद्यार्थी वर्गासाठी सकाळी व संध्याकाळी बस सोडली आहे. तशीच सकाळी 10.30 ते 11 वा., दुपारी 2 व संध्याकाळी 6.30 वा. अशा बसफेऱ्या वाढवून शेतकऱ्यांचा खर्च कमी करावा, अशी सरकारला तसेच परिवहन खात्याकडे शेतकरी व महिला वर्गाची मागणी आहे.
बळ्ळारी नाल्यापुढे जवळपास 800 ते 850 एकर यरमाळ रस्त्याच्या दोन्ही बाजूला शहापूर शिवार आहे. शहापूर, वडगाव भागातील अनेक महिला चालत जाऊन आपली शेतीची कामे करतात. खरिप हंगामात महिलांचीच कामे अधिक असतात. पावसाळ्यात तर दोन-तीनवेळा भांगलण करावी लागते. गटागटाने चालत जात असतात. जर रिक्षाने जायचे म्हटल्यास जाता-येता प्रत्येकी 40 ते 50 रु. लागतात.
...तर महिला मोर्चाने निवेदन देणार
येत्या काळात शेतकरी व महिला संबंधित परिवहन खाते, उच्च अधिकारी यांच्या कार्यालयावर शहापूर, वडगाव व इतर भागातील शेतकरी व महिला मोर्चाने येऊन निवेदन देण्याच्या तयारीत आहेत. तेव्हा परिवहन खात्याने शेतकऱ्यांप्रती वडगाव-यरमाळ रस्त्यावर बसफेऱ्या वाढवून दिलासा द्यावा, अशी बेळगाव तालुका रयत संघटना तसेच परिसरातील शेतकरी महिलांतर्फे मागणी करण्यात येत आहे.