निरवडे बस स्टॉपवरील बेंचवर अज्ञाताने ओतला मातीचा ढीग
ग्रामस्थांतून नाराजी ; कारवाई करण्याची ग्रामपंचायतकडे मागणी
न्हावेली /वार्ताहर
प्रवाशांना सोयीचे व्हावे म्हणून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून निरवडे येथील गावठणवाडी बस स्टॉपवर बसविण्यात आलेल्या बेंचवर अज्ञात व्यक्तीने मातीचा ढिग ओतून ठेवला आहे.गेल्या चार दिवसांपासून मातीचा ढीग तेथेच असल्याने बसची वाट पाहणार्या प्रवासी आणि शाळकरी विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे.अशा प्रवृतीचा शोध घेऊन ग्रामपंचायतीने तात्काळ कारवाई करावी,अशी मागणी सावंतवाडी शिरोडा महामार्गावरून ये - जा करणाऱ्या प्रवाशांकडून केली जात आहे.निरवडे येथील गावठणवाडी बसस्टॉपवर आजूबाजूच्या वाडीतील जेष्ठ ग्रामस्थ महिला बसची वाट पाहत असतात.विशेषत : शाळकरी विद्यार्थ्यांसाठी हा बसस्टॉप अत्यंत महत्त्वाचा आहे.प्रवाशांना बसण्यासाठी सोयीचे व्हावे म्हणून ग्रामपंचायतीने याठिकाणी बेंचसची व्यवस्था केली होती.मात्र सुमारे चार दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीने या बेंचवर मोठा मातीचा ढिग आणून टाकला.यामुळे प्रवाशांना बसण्यासाठी गैरसोय होत आहे.ऊन किंवा पावसापासून बचाव करण्यासाठी आश्रय घेतलेल्या प्रवाशांना आता उभे राहूनच बसची वाट पाहावी लागत आहे.सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे अडथळा निर्माण करुन नागरिकांची गैरसोय करणे अत्यंत चुकीचे आहे.ग्रामपंचायतीने प्रवाशांच्या सोयीसाठी ही संकल्पना राबविली असताना कोणीतरी जाणूनबुजून त्यामध्ये व्यत्यय आणत आहे.यामुळे स्थानिक ग्रामस्थ आणि प्रवाशांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. बसस्टॉपच्या ठिकाणी अशा प्रकारे मातीचे ढिग टाकणे हे योग्य नाही.अशा समाजविघातक प्रवृतींना वेळीच आवर घालण्याची गरज आहे.त्यामुळे ग्रामपंचायतीने या घटनेची गांभीर्याने दखल घ्यावी.ज्या व्यक्तीने हा प्रकार केला आहे.त्याचा शोध घेऊन त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी तात्काळ बेंच मोकळा करुन द्यावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.या प्रकारावर ग्रामपंचायत काय भूमिका घेते आणि कधी कारवाई करते याकडे आता सर्वाचे लक्ष लागले आहे.