कॅसलरॉक-मिरज एक्स्प्रेस पंढरपूरपर्यंत नेण्याची मागणी
वैकुंठ एकादशीला जाणाऱ्यांची होईल सोय
प्रतिनिधी/ बेळगाव
वैकुंठ एकादशीनिमित्त हुबळी, बेळगाव, मिरज परिसरातील शेकडो भाविक पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनाला जातात. भाविकांच्या सोयीसाठी 28 डिसेंबर ते 2 जानेवारीपर्यंत कॅसलरॉक-मिरज एक्स्प्रेसचा विस्तार पंढरपूरपर्यंत करावा, अशी मागणी वारकऱ्यांकडून नैर्त्रुत्य रेल्वेकडे करण्यात आली आहे.
बुधवार दि. 31 डिसेंबर रोजी वैकुंठ एकादशी आहे. कार्तिक एकादशीला नैर्त्रुत्य रेल्वेने हुबळी-पंढरपूर दरम्यान विशेष रेल्वेफेरी सुरू केली होती. त्यावेळी भाविकांचा उत्तम प्रतिसाद रेल्वेला मिळाला. सध्या हुबळी किंवा बेळगावमधून पंढरपूरला थेट रेल्वेसेवा उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे किमान उत्सव काळात तरी रेल्वे सुरू करण्याची मागणी केली जात आहे.
सध्या धावत असलेली कॅसलरॉक-मिरज ही एक्स्प्रेस पंढरपूरपर्यंत सुरू केल्यास एकादशीच्या दिवसांमध्ये भाविकांना पंढरपूरला पोहोचणे सोयीचे होणार आहे. सध्या हुबळी अथवा बेळगावमधून मिरजला पोहोचून तेथून मिळेल त्या रेल्वेने पंढरपूर गाठावे लागत आहे. नैर्त्रुत्य रेल्वेने वैकुंठ एकादशीनिमित्त रेल्वे सुरू केल्यास प्रवाशांना पंढरपूर गाठणे सोयीचे होणार आहे, अशी मागणी करण्यात आली आहे.