दोडामार्गातील या गावात मोबाईल टॉवर ठरताहेत शोभेचे बाहुले
दोडामार्ग – प्रतिनिधी
दळणवळणाच्या सुविधा दुर्गम, डोंगराळ भागापर्यंत झाल्याचा दावा सरकारकडून केला जातो. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सुरक्षित उतरण्यापर्यंत देशाने प्रगती केली. परंतु, स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही या प्रगतीची गंगा अजूनही खेड्यापाड्यापर्यंत पोहोचली नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोडामार्ग तालुक्यातील तळेखोल व विर्डी या गावातील लोकांना आजही मोबाईल नेटवर्कसाठी एकतर गोव्यात नाहीतर तालुक्याच्या ठिकाणी धाव घ्यावी लागते. कारण या गावात बीएसएनएलने टॉवर उभारून आवश्यक असलेले इतर सर्व कामे पूर्ण केली आहेत. मात्र टॉवर कार्यान्वित न केल्याने उभारलेले टॉवर हे केवळ शोभेची बाहुले बनली आहेत असेही ग्रामस्थांकडून बोलले जात आहे.
मोबाईल टॉवर कार्यान्वित करण्याची मागणी ....
तालुक्यातील विर्डी व तळेखोल या गावात अनेक वेळा मोबाईल टॉवर कार्यान्वित करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. परंतु, अद्याप या हे उभारलेले टॉवर कार्यान्वित करण्यात आले नाहीत. शिवाय विर्डी हे गाव गोवा राज्याच्या सीमावर्ती भागात वसलेले आहे. मोबाईल नेटवर्क नसल्याने गावकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतोय. त्यामुळे शासनाने तात्काळ या गावातील उभारलेले मोबाईल टॉवर कार्यान्वित करून नेटवर्कची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.