शहापूर स्मशानभूमी शेडवरील पत्रे बदलण्याची मागणी
15 दिवसात दुरुस्ती न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा
बेळगाव : शहापूर स्मशानभूमीच्या शेडवरील पत्रे पूर्णपणे खराब झाले आहेत. काही पत्रे लोंबकळत असून ते कधी पडतील, याची शाश्वती नाही. तेव्हा तातडीने त्याची दुरुस्ती करावी. 15 दिवसात दुरुस्ती न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नगरसेवक रवी साळुंखे यांनी दिला आहे. शहापूर स्मशानभूमीकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून शेडवरील पत्रे खराब झाले आहेत. याठिकाणी पथदीपही नसल्यामुळे अंधारातच अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. अनेक समस्यांनी ही स्मशानभूमी ग्रासली आहे. तेव्हा तातडीने येथील समस्या दूर कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला. शेडवरील पत्रे खराब झाल्यामुळे पावसाळ्यात त्याठिकाणी उभे राहणेही कठीण झाले आहे. पत्रा पडून जखमी होण्याची भीतीही व्यक्त होत आहे. तेव्हा दुर्घटना घडण्यापूर्वी तातडीने पत्रे बदलावेत, अशी मागणी होत आहे.