व्हीबी-जी राम जी रद्द करून मनरेगा लागू करण्याची मागणी
बेळगाव : केंद्र सरकारने मनरेगा योजना रद्द करून त्याठिकाणी व्हीबी-जी राम जी योजना जारी केली आहे. या योजनेमुळे कामगारांवर अन्याय होणार असून, काम करणे मुश्कील बनणार आहे. तसेच ही योजना केंद्राच्या मर्जीप्रमाणे राबविण्यात येणार असून एकप्रकारे केंद्राचे गुलाम असल्यासारखे कामगारांना वागणूक मिळणार आहे. यासाठी केंद्र सरकारने व्हीबी-जी राम जी योजना रद्द करून मनरेगा पूर्वीप्रमाणे जारी करण्याची मागणी ग्रामीण कुली कर्मचारी संघटनेच्यावतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन ता. पं. ईओ व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. प्रारंभी ता. पं. कार्यालय आवारात महिला कर्मचारी एकत्र आल्या. यानंतर काहीकाळ ठिय्या आंदोलन करून व्हीबी-जी राम जी योजना रद्द करण्याची मागणी करण्यात आली.
यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी येथेही काहीकाळ आंदोलन करून घोषणाबाजी करत मनरेगा पूर्वीप्रमाणे जारी करण्याची मागणी करण्यात आली. निवेदनात, व्हीबी-जी राम जी योजनेंतर्गत किमान वेतनाचा अधिकार बाजूला करण्यात आला आहे. केंद्र सरकारने निश्चित केलेले वेतन आणि कामांचे स्थलांतरही वाढणार आहे. तसेच कामगारांना कमी वेतनावर काम करावे लागणार असून त्यांच्यावर अन्याय होणार आहे. यामुळे व्हीबी-जी राम जी योजना रद्द करण्यात यावी. सार्वत्रिक व रोजगाराचा अधिकार असलेली मनरेगा योजना पुन्हा लागू करण्याची मागणीही करण्यात आली.