दयानंद यांचे निलंबन रद्द करण्याची मागणी
निलंबन मागे न घेतल्यास आंदोलनाचा इशारा
बेळगाव : बेंगळूर येथे आरसीबीच्या विजयोत्सवादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला. राज्य सरकारची जबाबदारी असताना आपल्या चुकीचे खापर दुसऱ्याच्या माथी मारण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निलंबन तर काहींच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बेंगळूरचे तत्कालीन आयुक्त बी. दयानंद यांचे निलंबन करण्यात आले. सरकारकडून आपले अपयश लपवण्यासाठी कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. याचा आम्ही निषेध करतो. आठवड्याभरात दयानंद यांचे निलंबन रद्द करून त्यांची पुन्हा बेंगळूर आयुक्तपदी नियुक्ती करावी. जर असे न झाल्यास रस्त्यावर उतरून चलो बेंगळूर आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा वाल्मिकी समाजाच्यावतीने देण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बेंगळूरमध्ये जी चेंगराचेंगरी झाली ती केवळ राजकर्त्यांमुळे झाली असून, सरकार आपले अपयश लपवण्यासाठी दुसऱ्यांचा बळी घेत आहे. पोलीस विभागाने विजयोत्सवाला परवानगी नाकारली असतानाही आपल्या स्वार्थापोटी विजयोत्सव साजरा करण्यात आला.
वाल्मिकी समाजाकडून निलंबनाचा निषेध
दयानंद यांनी आतापर्यंतच्या कार्यकाळात अनेकवेळा आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. प्रामाणिक, निष्पक्ष व कार्यक्षम अधिकारी म्हणून नावलौकिक मिळविला आहे. त्यांच्याबाबत बेंगळूरवासियांमध्ये आदराचे स्थान आहे. दयानंद यांच्या निलंबनाचा वाल्मिक समाजाकडून निषेध करण्यात येत आहे. दयानंद यांचे निलंबन मागे घेण्यात आले नाही तर परिणामी चलो बेंगळूर आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.