बांगलादेशात शेख हसिना यांच्या पक्षावर बंदी घालण्याची मागणी
ढाका : बांगलादेशात मुदतपूर्व निवडणूक करविण्यासाठी वाढत्या दबावादरम्यान मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार निवडणुकांमध्ये शेख हसिना यांचा पक्ष अवामी लीगवर बंदी घालण्यावरून दुविधेत आहे. जुलै-ऑगस्टमध्ये झालेल्या बंडाचे नेतृत्व करणारे विद्यार्थी नेते अवामी लीगला निवडणुकीत सहभागी होण्यापासून रोखण्याची मागणी करत आहेत. तर दुसरीकडे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी आणि त्याचे सहकारी अशाप्रकारच्या बंदीला विरोध करत आहेत. बांगलादेशात अवामी लीगच्या अनुपस्थितीत सर्वात मोठा पक्ष असलेला बीएनपी आणि त्याचे सहकारी देशात लवकरात लवकर निवडणूक करविण्याची मागणी करत आहेत. निवडणुकीपूर्वी सर्व राजकीय सुधारणा पूर्ण केल्या जाव्यात आणि राजकारणात अवामी लीगच्या भागीदारीच्या वैधतेवर विचार केला जावा असे त्यांचे म्हणणे आहे. तर या मागण्यांवरून अंतरिम सरकार कोंडीत सापडले आहे. अवामी लीग एक राजकीय पक्ष असून लोकांनी हा पक्ष निवडणुकीत उतरावा की नाही, हे ठरवावे. ज्या लोकांनी देशाच्या नागरिकांची हत्या केली आणि देशाचा पैसा लुटला, त्यांना कायद्याच्या कक्षेत आणले जावे, त्यांच्यावर खटला चालविला जावा असे बीएनपी महासचिव फखरुल इस्लाम आलमगीर यांनी म्हटले आहे. बीएनपी अध्यक्ष खालिदा जिया यांनी गुरुवारी सशस्त्र सैन्य दिवसाच्या स्वागत सोहळ्यात भाग घेतला आहे. फेब्रुवारी 2018 मध्ये तुरुंगात गेल्यापासून त्या पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमात दिसून आल्या आहेत.