लक्ष्मण सवदी यांना मंत्रिपद देण्याची मागणी
बेळगाव : राज्यातील गाणिग समाजाला मंत्रिमंडळ विस्तारात प्रतिनिधित्व देण्यात यावे. तसेच समाजाचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सवदी यांना मंत्रिपद देण्यात यावे. राज्याच्या राजकारणातील त्यांचा दीर्घ अनुभव, प्रशासकीय कार्यकौशल्य व समाजातील व्यापक स्वीकार यामुळे त्यांना मंत्रिपदाची संधी मिळावी, अशी मागणी गाणिग समाजाच्यावतीने करण्यात आली. मागणीचे निवदेन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. राज्यात लिंगायत गाणिग, कलशेट्टी गाणिग, पंचम गाणिग, देव गाणिग, सज्जन गाणिग, करे गाणिग, शेट्टी गाणिग, तेली गाणिग, ज्योतिपन गाणिग तसेच हैदराबाद-कर्नाटक व दक्षिण कर्नाटकात गाणिग समाजाची लोकसंख्या 40 लाखांहून अधिक आहे. स्वातंत्र्यानंतर काँग्रेस सरकारमध्ये गाणिग समाजातील एकाही आमदाराला मंत्रिपदाचा दर्जा मिळालेला नाही. त्यामुळे समाजामध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून आगामी मंत्रिमंडळ विस्तारात समाजाला न्याय मिळवून द्यावा.
...तर पुढील निर्णय घेणार
आमदार लक्ष्मण सवदी यांना राज्याच्या राजकारणात प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांच्या अनुभवाचा लाभ काँग्रेस सरकारने घ्यावा. तसेच त्यांची प्रशासनावरही चांगली पकड असल्याने सर्वसामान्यांच्या विकासासाठी ते नेहमी तत्पर पाहिले आहेत. यासाठी त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात यावे. जर गणिगा समाजाला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व देण्यात आले नाही, तर समाजाच्या हिताचा विचार करून योग्य निर्णय घेतला जाईल, असा इशाराही देण्यात आला.