आगामी अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी पॅकेजची घोषणा करण्याची मागणी
बेळगाव : शेतकरी हा जगाचा पोशिंदा असला तरी त्याला अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. नैसर्गिक आपत्तीसह विविध समस्यांचा सामनाही शेतकऱ्यांना करावा लागतो. आगामी बेळगाव येथील हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजची घोषणा करावी. तसेच शेतकऱ्यांच्या मागण्या त्वरित मान्य करून त्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई देऊन पिकांसाठी एमएसपी जाहीर करावी, अशी मागणी भारतीय क्रांतिकारी किसान सेनेच्यावतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना देण्यात आले.
यंदा शेतकऱ्यांनी गेल्यावर्षीपेक्षा अधिक मका पिकाचे उत्पादन घेतले आहे. यासाठी केंद्र सरकारने आधारभूत किमत जाहीर करून खरेदी केंद्रे सुरू करावीत. ईथेनॉलच्या उत्पादनासाठी तात्काळ मक्याची खरेदी करण्यात यावी. पीक विमामध्ये होणारा भेदभाव दूर करावा. यंदा मोठ्याप्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांनी पिके पूर्णपणे वाया गेली. मात्र विमा कंपन्यांकडून केवळ 10 टक्केच नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. सरकारने विमा कंपन्यांना कडक सूचना देऊन शेतकऱ्यांना 100 टक्के भरपाई देण्याचा आदेश द्यावा. भात, बाजरी, मका, हरभरा या पिकांसाठी एमएसपी जाहीर करून खरेदी केंद्रे सुरू करण्याची मागणीही करण्यात आली.