For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पश्चिम भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी

11:07 AM May 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
पश्चिम भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी
Advertisement

मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहतूक बनली धोकादायक : अपघातांच्या घटनांमध्ये वाढ

Advertisement

वार्ताहर/किणये

ग्रामीण भागाच्या विकासासाठी प्रशासनामार्फत विविध योजना राबविल्या जातात. अलीकडे तर रस्त्यांसाठी विशेष योजना राबविण्यात येत आहेत. तालुक्यातील काही रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आलेले आहे. मात्र पश्चिम भागातील अनेक रस्ते खड्डेमय बनलेले आहेत. या रस्त्यातून वाहतूक करणे अवघड बनले आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील अनेक संपर्क रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे अपघातांच्या घटना घडलेल्या आहेत. प्रशासनाचे या खड्ड्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी नागरिकांतून होत आहेत.

Advertisement

व्हिटीयु ते संतिबस्तवाड जुना रस्ता खड्डेमय बनलेला आहे. सध्या वाहनधारक नर्सरीजवळील रस्त्याचा वापर करीत आहेत. या रस्त्यावरीलही खड्डे बुजवण्याची मागणी वाहनधारकांतून करण्यात आली आहे. कर्ले ते बेळवट्टी संपर्क रस्त्याची दयनिय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. तसेच रस्त्याचा बहुतांशी भाग पूर्णपणे उखडून गेलेला आहे. रस्त्याच्या बाजूला मोठमोठे भगदाड पडलेले आहेत. गेल्या दहा ते बारा वर्षापासून या रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे, अशा तक्रारी नागरिक करत आहेत. 2019 साली अतिवृष्टी झाली. यावेळी कर्ले ते बेळवट्टी रस्त्यावर पाणी आले होते. चार ते पाच ठिकाणी रस्त्याचा भाग वाहून गेला होता. त्या ठिकाणी मोठमोठे भगदाड पडलेले आहेत. या रस्त्यावरून सध्या बैलगाडी जाणेसुद्धा मुश्किल बनले आहे.

 वाहनधारकांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करण्याची वेळ

जानेवाडी ते बिजगर्णी या संपर्क रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. या रस्त्यावरून वाहतूक करताना वाहनधारकांना जीव मुठीत घेऊनच वाहतूक करावी लागत आहे. जानेवारी गावच्या नाल्याजवळ रस्ता पूर्णपणे उखडून गेला आहे. तसेच संपूर्ण रस्त्यावर खड्डे व धूळ मातीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याच्या डांबरीकरणाचे दुर्लक्ष झाले असल्याचे तक्रारी स्थानिक नागरिकांतून होत आहेत.

अधिकाऱ्यांनी रस्त्यांची पाहणी करावी

पश्चिम भागातील रस्ते खडेमय बनलेले आहेत. याचा वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जानेवाडी ते बिजगर्णी या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. तसेच कावळेवाडी-बिजगर्णी दोन्ही रस्त्यांच्या बाजूने झाडेझुडपे वाढलेली आहेत. या झाडेझुडपांची साफसफाई करणे गरजेचे आहे. तसेच रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी वाहनधारकांतून करण्यात येत आहे. संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी या भागातील रस्त्यांची पाहणी करावी व दुरुस्तीचे कामकाज त्वरित हाती घ्यावे, अशी मागणी होत आहे.

Advertisement
Tags :

.