आझाद गल्लीतील रस्ता दुरुस्तीची मागणी
बेळगाव : शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या आझाद गल्ली परिसरात वर्षभरापूर्वी दुरुस्तीच्या कामासाठी पेव्हर्स काढण्यात आले होते. परंतु वर्ष उलटले तरी अद्याप रस्त्याचे काम करण्यात आलेले नाही. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून तातडीने हा रस्ता करून द्यावा, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. आझाद गल्ली परिसरात अनेक दुकाने तसेच गोडावून आहेत. त्यामुळे दररोज नागरिकांसोबत व्यापारी वर्गाची ये-जा सुरू असते. महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याकडे अनेकवेळा कळवून देखील त्याच्याकडून रस्त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. आझाद गल्ली परिसरात अरुंद रस्ता असून त्यातच पेव्हर्स काढण्यात आल्याने ये-जा करणेही अवघड होत आहे. महिनाभरापूर्वी या परिसरातील रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे आझाद गल्ली येथेही रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी केली जात आहे.