नारायणस्वामी, रविकुमार यांनी राजीनामा देण्याची मागणी
बेळगाव : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते नारायणस्वामी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानजनक व्यक्तव्य केले असून मंत्री प्रियांक खर्गे यांना शिवीगाळ केल्याची घटना काही दिवसांपूर्वी गुलबर्गा येथे घडली. तसेच आमदार रविकुमार यांनीही गुलबर्गा जिल्हाधिकारी पौजीया तरुनम यांच्याबाबत अपमानजनक व्यक्तव्य केले आहे. याचा आम्ही निषेध करत असून या नेत्यांनी आपला राजीनामा देण्याची मागणी कर्नाटक दलित संघर्ष समितीच्यावतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांना देण्यात आले. अलिकडच्या काळात भाजप व आरएसएस समाज कलुषित करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र मल्लिकार्जुन खर्गे व प्रियांक खर्गे यांनी त्यांचे प्रयत्न धुळीस मिळविले आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात अवमानजनक विधाने करून समाजात तेढ पसरविण्याचा प्रयत्न भाजप नेते करत आहेत. तसेच आपला स्वार्थ साधण्यासाठी अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. यामुळे अशा नेत्यांवर वेळीच आळा घालण्याची गरज असून अशांवर योग्य कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही केली आली.