बळ्ळारी नाल्यातील गाळ काढण्याची मागणी
बेळगाव : बळ्ळारी नाल्यातील गाळ काढण्याचे काम झाले नसल्याने येळ्ळूर रोड, तसेच अनगोळ शिवारातील शेकडो एकर शेती पुराच्या पाण्याखाली येत आहे. नुकत्याच झालेल्या परतीच्या पावसानेही शेतीमध्ये पाणीच पाणी केले आहे. बळ्ळारी नाल्यातही पाणी साचू लागले आहे. जर सुळेभावीजवळील नाल्याची स्वच्छता झाल्यास पाण्याचा निचरा होण्याची शक्यता आहे. बेळगाव शहराला लागून गेलेला बळ्ळारी नाला हा शहरासाठी व शेतकऱ्यांसाठी धोकादायक ठरला आहे. नाल्याचे पाणी ओव्हरफ्लो होऊन आजूबाजूच्या शेतीत पसरत आहे. त्यामुळे दरवर्षी पुराच्या पाण्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे बळ्ळारी नाल्याच्या समस्या कायमस्वरुपी सोडविण्याची मागणी शेतकरीवर्गातून केली जात आहे. सुळेभावी येथील नाल्याजवळ मोठ्या प्रमाणात कचरा, तसेच जलपर्णी वाढली आहे. यामुळे पाण्याचा निचरा होण्यास अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे शेतीमध्ये पावसाचे पाणी जात आहे. नाल्याची स्वच्छता झाल्यास पाण्याचा निचरा होऊन शेतामधील पाणी वाहून जाण्यास मदत होणार आहे. त्यामुळे स्वच्छतेची मागणी शेतकरीवर्गाने केली आहे.