For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जांबोटी-खानापूर राज्य महामार्गावरील धोकादायक वृक्ष हटविण्याची मागणी

10:36 AM Jun 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
जांबोटी खानापूर राज्य महामार्गावरील धोकादायक वृक्ष हटविण्याची मागणी
Advertisement

वार्ताहर /जांबोटी

Advertisement

जांबोटी-खानापूर राज्य महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे धोकादायक वृक्ष वनखात्याने त्वरित हटवावेत, अशी मागणी जांबोटी भागातील वाहनधारकांमधून होत आहे. जांबोटी-खानापूर राज्य महामार्ग हा खानापूर तालुक्यातील आंतरराज्य वाहतुकीसाठी महत्त्वाचा मार्ग म्हणून गणला जातो. या रस्त्यावरुन गोवा, कर्नाटक या दोन्ही राज्यांमध्ये मोठ्याप्रमाणात वाहतूक चालते. जांबोटी-खानापूर या रस्त्याचा बहुतांश भाग जंगलमय भागातून गेला असल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा अनेक ठिकाणी धोकादायक वृक्ष व बांबूची बेटे कलली आहेत. मात्र सदर धोकादायक वृक्ष व झाडाच्या फांद्या हटविण्याकडे वनखाते व सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष झाले आहे.

या भागात जून ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत मुसळधार पाऊस व वादळी वारे सुरू असतात. त्यामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी जुनाट वृक्ष उन्मळून पडणे तसेच झाडांच्या फांद्या तुटून पडणे आदी कारणांमुळे पावसाळ्यामध्ये या रस्त्यावरील वाहतूक वारंवार ठप्प होत असल्याने वाहनधारक व नागरिकांना अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो. तसेच जुनाट वृक्ष रस्त्यावर अनेक ठिकाणी कलल्यामुळे वादळी वारे व पावसामुळे चालत्या वाहनांवर देखील पडण्याची शक्यता आहे. मलप्रभा नदीजवळील शंकरपेठ चढतीला तसेच वडगाव फाटा, विजयनगर-गवळीवाड्या नजीकच्या रस्त्याच्या दुतर्फा अनेक ठिकाणी कलल्यामुळे यामध्ये वाहनधारकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.

Advertisement

मागील आठवड्यात चालत्या दुचाकीवर झाड पडल्यामुळे बेळगुंदीनजीक दोघा युवकांचा बळी गेल्यामुळे जांबोटी-खानापूर रस्त्यावरील धोकादायक वृक्षांचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे. तरी सदर घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी वनखाते व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वरिष्ठ अधिकारी वर्गानी लक्ष घालून जांबोटी-खानापूर राज्य महामार्गावरील धोकादायक वृक्ष हटवून रस्ता वाहतुकीसाठी निर्धोक करावा, अशी मागणी जांबोटी भागातील नागरिक व वाहनधारकांमधून होत आहे.

Advertisement
Tags :

.