मण्णूरला नियमित स्वतंत्र बस सोडण्याची मागणी
हिंदवी स्वराज्य संघटनेकडून आंदोलन : परिवहन विभागाला निवेदन
वार्ताहर/हिंडलगा
मण्णूर गावाला नियमित व वेळेवर बस व गावाकरिता स्वतंत्र बस सोडण्यासाठी मण्णूर येथील हिंदवी स्वराज्य युवा संघटनेच्या पुढाकारातून कर्नाटक राज्य परिवहन खात्याच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष बाळू आनंदाचे, सभासद व गावातील नागरिक, महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. मण्णूर गाव हे शैक्षणिकदृष्ट्या प्रगत असून कामगारवर्गही मोठ्या प्रमाणात आहे. या शिवाय बेळगाव जिल्ह्याचे जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण केंद्र (डाएट कार्यालय) येथे आहे. या शिक्षण केंद्रात अधिकारीवर्ग, प्राध्यापक, प्रशिक्षणार्थी यांना बसवरच अवलंबून रहावे लागत असून प्राथमिक, माध्यमिक व प्रशिक्षण केंद्राला जाणाऱ्या सर्व कर्मचारी वर्गाला वेळेत पोहोचणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जिल्ह्याचे महत्त्वाचे केंद्र असून बेळगाव दक्षिण शैक्षणिक विभागात येणाऱ्या सर्व तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना प्रशिक्षण घेण्यासाठी यावे लागते.
पाच दिवसांचे, दहा दिवसाचे प्रशिक्षण घेण्यासाठी आपल्या तालुक्याच्या ठिकाणांहून आपली वाहने आणली जात नसून गोजगा व आंबेवाडी बसवर अवलंबून रहावे लागते. मण्णूर गावासाठी स्वतंत्र बस नसल्याने गोजगा व आंबेवाडी गावाकरिता सोडलेल्या बसवर अवलंबून रहावे लागते. परंतु या बसेस पूर्ण भरुन आल्याने येथे थांबू शकत नाहीत. त्यामुळे वेळेत जाणे कठीण होत आहे. एखादी बस थांबलीच तर बसमध्ये वयस्कर प्रवासीवगाला जागा नसल्याने भांडणे होत असतात. याकिरता गोवाला नियमित बस व स्वतंत्र बस सोडणे अत्यंत आवश्यक असल्याचे आंदोलन करणाऱ्या संघटनेने केएसआरटीसी अधिकाऱ्यांना पटवून दिले. यावेळी दिलेल्या निवेदनाचा स्वीकार करून लवकरात लवकर गावासाठी स्वतंत्र बस व जादा फेऱ्या वाढविण्याबाबत प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.