प्राथमिक शाळा शिक्षक संघाची मतदार यादी प्रसिद्ध करण्याची मागणी
बेळगाव : कर्नाटक राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या निवडणुकांना सुरुवात झाली आहे. मात्र बेळगाव जिल्हा प्राथमिक शाळा शिक्षक संघाची मतदार यादी अद्याप प्रसिद्ध करण्यात आली नसल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने ही यादी लवकरात लवकर प्रसिद्ध करावी, अशी मागणी मंगळवारी कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघ बेळगावतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. 2024-29 या कालावधीसाठी राज्यातील 64 विभागांमध्ये कर्मचारी संघटनेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. दि. 9 पासून निवडणुकांच्या कामांना सुरुवात झाली. परंतु प्राथमिक शाळा शिक्षक संघाची मतदार यादी अद्याप प्रसिद्ध केली नाही. यादीतील काही नावे वगळल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामध्ये अनेक त्रुटीही आहेत. तरी जिल्हाप्रशासनाने पात्र मतदारांची यादी प्रसिद्ध करण्याची मागणी केली आहे. अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी संघटनेचे जयकुमार हेब्बळी, राच्चण्णावर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.