For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कणबर्गी मराठी शाळेत शारीरिक शिक्षकांची मागणी

11:02 AM Jun 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
कणबर्गी मराठी शाळेत शारीरिक शिक्षकांची मागणी
Advertisement

दोनशेहून अधिक विद्यार्थी असूनही खात्याचे दुर्लक्ष

Advertisement

बेळगाव : पटसंख्या कमी असल्याने अनेक मराठी शाळांमधून शारीरिक शिक्षक हे पद रिक्त करण्यात आले. परंतु, ज्या शाळांमध्ये 200 हून अधिक पटसंख्या आहे, त्या शाळांनाही शारीरिक शिक्षक देण्यास शिक्षण विभागाची तयारी नाही. कणबर्गी येथील सरकारी मराठी हायर प्रायमरी शाळेमध्ये 205 हून अधिक पटसंख्या असूनही मागील दोन वर्षांपासून शारीरिक शिक्षक मिळावेत, यासाठी शाळा सुधारणा कमिटीचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु, त्यांना अद्याप शारीरिक शिक्षण शिक्षक देण्यात आलेला नाही. शहर तसेच तालुक्यातील काही मोजक्या मराठी शाळांमध्ये 200 हून अधिक पटसंख्या आहे. इंग्रजीचे वाढते फॅड, शहरातील शाळांच्या ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेल्या स्कूल बस यामुळे पटसंख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. असे असतानाही काही शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन पटसंख्या टिकवून आहेत. परंतु, त्या मानाने या शाळांना शिक्षक उपलब्ध होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. कणबर्गी येथील शाळेमध्ये 200 हून अधिक पटसंख्या आहे. सध्या या ठिकाणी सात कायमस्वरुपी तर एक अतिथी शिक्षक कार्यरत आहेत. 200 हून अधिक पटसंख्या असलेल्या शाळांना शारीरिक शिक्षण शिक्षक दिला जातो. परंतु, कणबर्गी शाळेला मागील दोन वर्षात शारीरिक शिक्षकच नसल्याने क्रीडा प्रकारांना खीळ बसली आहे. आजूबाजूला इंग्रजी शाळा उपलब्ध असतानाही शाळेमध्ये पटसंख्या टिकून असल्याने शिक्षक तसेच एसडीएमसी कमिटीकडून शारीरिक शिक्षण शिक्षक नेमण्याची मागणी केली जात आहे. मागील वर्षीही शहर गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे शारीरिक शिक्षक द्यावा, या मागणीसाठी निवेदन देण्यात आले होते.परंतु,अद्याप या शाळेला शारीरिक शिक्षण शिक्षक उपलब्ध झालेला नाही.

शिक्षण विभागाकडे पाठपुरावा सुरू

कणबर्गी येथील मराठी शाळेमध्ये सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने पटसंख्या वाढली आहे. गावातील युवक, माजी विद्यार्थी, लोकप्रतिनिधी यांनी स्वखर्चातून शाळेला साहित्य उपलब्ध करून दिले आहे.आता केवळ शारीरिक शिक्षण शिक्षकाची गरज असून यासंदर्भात शिक्षण विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे.

किसन सुंठकर, अध्यक्ष, शाळा सुधारणा समिती

Advertisement
Advertisement
Tags :

.