मर्सिडीज बेंझ कारची मागणी पुरवठ्यापेक्षा अधिक
भारतात 1000 पेक्षा अधिक कार्सची ऑर्डर : ईव्ही सीएलएची मागणी अपेक्षेपेक्षा अधिकच
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
भारतात मर्सिडीज-बेंझ कारला ग्राहकांकडून मोठी मागणी होत आहे, परंतु कंपनी मागणीनुसार वाहनांचा पुरवठा करू शकत नाही आहे. विशेषत: इलेक्ट्रिक सीएलएची मागणी अपेक्षेपेक्षा खूप जास्त आहे. जर कंपनीला पुरेशा प्रमाणात सीएलए इलेक्ट्रिक कार मिळाल्या, तर ती सुमारे 1,000 अधिक वाहने विकू शकणार असल्याची माहिती आहे.
मर्सिडीज-बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ संतोष अय्यर यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, कंपनीकडे सीएलएसाठी 1,000 हून अधिक ऑर्डर्स आहेत आणि त्याच्या डिलिव्हरीसाठी मार्च-एप्रिल 2027 पर्यंत प्रतीक्षा करावी लागत आहे. अय्यर यांच्या मते, कंपनीच्या वाहनांची मागणी इतकी जोरदार आहे की विक्रीत दुहेरी अंकी वाढ होऊ शकते, परंतु पुरवठ्याची कमतरता अडथळा ठरत आहे.
9 महिन्यात 15,190/ गाड्यांची विक्री
मर्सिडीज-बेंझ इंडियाने जानेवारी ते सप्टेंबर 2026 दरम्यान 15,190 वाहनांची डिलिव्हरी केली. ही गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा 8 टक्क्यांनी जास्त आहे. कंपनीने जुलै-सप्टेंबर तिमाहीत 5,422 वाहनांची विक्री केली. ही आतापर्यंतच्या कोणत्याही तिमाहीतील कंपनीची सर्वाधिक विक्री आहे. वार्षिक आधारावर यात 6 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
लक्झरी-महागड्या टॉप-एंड कारचा समावेश
कंपनीच्या मते, सामान्य लक्झरी कारपासून ते महागड्या टॉप-एंड कार आणि एंट्री-लेव्हल लक्झरी सेगमेंटपर्यंत सर्वांनी विक्री वाढीस हातभार लावला आहे. अय्यर म्हणाले की, सध्याची मागणी पाहता, कंपनीसाठी उच्च एक-अंकी वाढ साध्य करणे शक्य आहे. कंपनीने यापूर्वी या वर्षासाठी एक-अंकी वाढीचा अंदाज वर्तवला होता.
