विद्यार्थिनीच्या आत्महत्येची चौकशी करण्याची मागणी
कारवार : गेल्या गुरुवारी येथील मुलींच्या बालमंदिरामध्ये विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या प्रकरणाची कसून चौकशी करण्याची मागणी कारवार तालुक्यातील भंडारी समाजोन्नती संघाने केली. कारवार जिल्हाधिकारी के. लक्ष्मीप्रिया यांची भेट घेऊन मयत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी, भंडारी समाजबांधवांनी निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, येथील महिला आणि बाल कल्याण खात्याच्या बालमंदिरामध्ये वास्तव्य करुन दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या श्वेता शैलेश घणेकर (वय 16, रा. कोडीबाग, कारवार) या गरीब विद्यार्थिनीने गेल्या गुरुवारी
हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. दिवंगत शैलेश आणि अश्विनी घणेकर यांची तृतीय कन्या असलेल्या श्वेता या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याने घणेकर या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे आणि फार मोठा अन्याय झाला आहे. मयत श्वेता हिची आई अश्विनी मोलमजुरी करुन आपल्या चार अपत्यांचा सांभाळ करीत होती. तथापि, या विद्यार्थिनीने हॉस्टेलच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. विद्यार्थिनीच्या आत्महत्येला हॉस्टेलचा वॉर्डन आणि कर्मचारीच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. या आत्महत्येप्रकरणी यापूर्वीच कारवार शहर पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तथापि, कोणत्याही कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही. त्याकरिता या प्रकरणाची चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी. त्याद्वारे गरीब कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी भंडारी समाजोन्नती समितीचे अध्यक्ष मोहन किंदळकर, नगराध्यक्ष रविराज अंकोलेकर, सदस्य मुन्ना रेवंडीकर, समीर नाईक, प्रवीण मांजरेकर, विजू कांबळे, दिनेश नाईक, महेश तामसे, दिनेश नाईक, साईकिरण बाब्रेकर, सदानंद मांजरेकर, रोहिदास वायंगणकर आदी उपस्थित होते.