रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत इंटरसिटी-एक्स्प्रेस रेल्वेंची मागणी
बेळगाव-हैदराबाद-मनगुरू एक्स्प्रेस लवकरच सुरू
बेळगाव : प्रवाशांच्या सोयीसाठी नैर्त्रुत्य रेल्वेने बेळगाव-वास्को इंटरसिटी, बेळगाव-सोलापूर व्हाया मिरज एक्स्प्रेस, तसेच बेळगाव-मंगळूर, बेळगाव-तिरुपती व बेळगाव-चेन्नई एक्स्प्रेस सुरू करावी, अशी मागणी रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत सदस्यांनी केली. यावेळी बेळगाव-हैदराबाद-मनगुरू एक्स्प्रेस लवकरच सुरू होईल, असा विश्वास नैर्त्रुत्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. बेळगाव रेल्वेस्थानक सल्लागार समितीची बैठक बुधवारी पार पडली. बैठकीमध्ये नवीन रेल्वे सुरू करण्यासोबत विकासकामांबाबत चर्चा झाली. हुबळी-दादर एक्स्प्रेसला एलएचबी कोच लावले जाणार होते.
परंतु, अद्याप विलंब का झाला? असा प्रश्न उपस्थित केला. बेळगाव-मंगळूर व्हाया वास्को एक्स्प्रेस, बेळगाव-चेन्नई आठवड्यातून दोन दिवस, हुबळी-राजकोट/ओखा एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी रेल्वे अधिकाऱ्यांकडे करण्यात आली. बेळगाव-सोलापूर व्हाया मिरज एक्स्प्रेस सुरू झाल्यास पंढरपूरच्या भाविकांची तर सोय होईलच. त्याचबरोबर सोलापूरजवळील तुळजापूर, अक्कलकोट व इतर देवस्थानांना ये-जा करणे सोयीचे होणार असल्याने नैर्त्रुत्य रेल्वेने लक्ष पुरवावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी अरुण कुलकर्णी, संदीप भिडे, संदीप इंगळे, सनदी, अंकले, सुमंत धारेश्वर, नैर्त्रुत्य रेल्वे सल्लागार समितीचे प्रसाद कुलकर्णी, स्टेशन सुपरिंटेंडेंट दशरथ, डेप्युटी कमर्शियल मॅनेजर औरवाडकर, भीमाप्पा यांसह इतर उपस्थित होते.