For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रोहयेंतर्गत त्वरित मासिक वेतन देण्याची मागणी

06:04 AM Apr 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
रोहयेंतर्गत त्वरित मासिक वेतन देण्याची मागणी
Advertisement

वार्ताहर/ उचगाव

Advertisement

रखरखत्या उन्हात देखील रोजगार हमी योजनेअंतर्गत वेगवेगळ्या गावातील ग्रामपंचायतींमार्फत विविध नेमून दिलेल्या कामात महिला प्रामाणिकपणे काम करत असल्याचे चित्र दिसून येते. उन्हात अंगाची लाहीलाही होत असताना देखील तुटपुंज्या पगारासाठी या महिला धडपडत असतात. मात्र इतक्या उन्हात देखील काम करणाऱ्या महिलांकडे मात्र कोणाचे लक्ष जात नाही. हेचतर खरे दुर्भाग्य आहे.

बेळगाव ग्रामीण भागातील ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील महिलांना रोहयेंतर्गत कामे नेमून दिलेली असतात. ती कामे या महिला प्रामाणिकपणे करत असताना दिसून येत आहेत. यामध्ये गटारी, नदी-नाले, तलावांची किंवा इतर भरावाची कामे या महिला दिलेल्या वेळेनुसार पूर्ण करण्यात गुंतलेल्या असतात. सध्या उष्णतेने कहर केला आहे. रखरखत्या उन्हात घाम गाळत स्वत:चा घरसंसार चालविण्यासाठी शासनाकडून मिळणाऱ्या मानधनाच्या अपेक्षेने या महिला दुपारची शिदोरी घेऊन जातात.

Advertisement

उन्हाळी दिवसांमध्ये सकाळी आणि सायंकाळी कमी ऊन असताना काम करण्याची मुभा त्यांना दिली पाहिजे. कामाचे जितके तास आहेत, तेवढे सकाळी आणि सायंकाळी त्यांनी केले तर या महिलांना उन्हापासून होणारा त्रास सहन करावा लागणार नाही.

या महिला ‘तरुण भारत’ वार्ताहराशी बोलताना आपले मन मोकळे करताना म्हणाल्या  की, महिन्याला जो शासनाकडून पगार मिळतो, तो वेळेत मिळत नाही. दोन ते तीन महिन्यानंतर खात्यावर जमा होतो. यामुळे आपण राबूनसुद्धा वेळेत पैसे मिळत नसल्याने आम्ही आमचे घरसंसार कसे चालवावे? मुलाबाळांना काय खाऊ घालावे, त्यांचे शिक्षण, कपडे याची कशी व्यवस्था करावी, असेही सांगण्यात येत होते.

यासाठी शासनाने दर महिन्याच्या 30 तारखेला त्यांच्या बँक खात्यावर तातडीने पगार जमा करावा, अशी मागणी केली आहे.

Advertisement
Tags :

.