महापालिका आयुक्तांकडे हायमास्ट दुरुस्तीची मागणी
बेळगाव कोअर डेव्हलपमेंट ग्रुपच्या सदस्यांनी घेतली भेट
बेळगाव : बेळगाव शहर हे स्मार्ट सिटी म्हणून ओळखले जात असताना अनेक ठिकाणी हायमास्ट बंद पडले आहेत. शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्येच हायमास्ट बंद असल्याने रात्रीच्या वेळी वाहने चालविणे धोक्याचे ठरत आहे. यामुळे अपघात होत असून, महानगरपालिकेने वेळीच हायमास्ट दुरुस्त करावेत, अशी मागणी बेळगाव कोअर डेव्हलपमेंट ग्रुपच्यावतीने महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे. शहरातील महत्त्वाच्या असलेल्या टिळकवाडी येथील आरपीडी चौक तसेच धर्मवीर संभाजी महाराज चौकानजीकच्या यंदे खूट येथे हायमास्ट बंद आहेत. हे दोन्ही चौक शहरातील महत्त्वाचे चौक असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. रात्रीच्या वेळी अंधारात वाहने चालवावी लागत असल्याने अपघातही होत आहेत. इतर शहरातून बेळगावमध्ये येणाऱ्या नागरिकांना हायमास्ट नसल्याने ये-जा करणे अवघड जात आहे. त्यामुळे महत्त्वाच्या ठिकाणी हायमास्ट सुरू करण्याची मागणी ग्र्रुपच्यावतीने करण्यात आली. यावेळी बेळगाव कोअर डेव्हलपमेंट ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.