युरोपियन देशात द्राक्षाची मागणी वाढली
सांगली :
सांगली जिल्ह्यातून आखातासह युरोपियन देशातून द्राक्षांची मागणी वाढू लागली आहे. परंतु यावर्षी काडी पिकण्याच्या काळात पाऊस जास्त झाल्याने द्राक्षाच्या उत्पन्नात सरासरी 20 ते 25 टक्क्यांनी घट झाली आहे. परिणामी द्राक्षांची निर्यातही कमी होण्याच्या शक्यतेने निर्यातक्षम द्राक्षांच्या दरात तेजी आहे. आतापर्यंत मलेशिया, नेदरलँडसह आखाती देशात जिल्ह्यातून 513 टन द्राक्षांची निर्यात झाली. उत्पादन घटल्याने देशांतर्गंत मार्केटची द्राक्षेही निर्यात करण्यात येत आहेत.
विशेष म्हणजे एका बाजूला द्राक्षक्षेत्रात घट होत असतानाच निर्यातक्षम द्राक्षांच्या वाणाकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. जिल्ह्यातून दरवर्षी युरोप, आखातासह विविध देशांना मोठ्या प्रमाणावर द्राक्षांची निर्यात होते. सध्या जिल्ह्यात सरासरी एक हजार ते 1100 एकरपर्यंत निर्यातीच्या द्राक्षांची लागवड केली आहे. परंतु फळधारणेच्या काळात पाऊस झाल्याने यंदा द्राक्षांचे प्रमाण कमी आहे. तर द्राक्षांची शुगर, वजनामध्येही घट झाली आहे. परिणामी निर्यातदारांची मागणी पूर्ण होत नसल्याचे चित्र आहे.
दरात तेजी कायम चालू हंगामात आतापर्यंत मलेशियाला दोन, नेदरलँडला दोन आणि आखाती देशात 43 कंटेनरमधून 513 टन द्राक्षाची निर्यात झाली. सुरूवातीच्या काळात प्रतिकिलोचा दर 100 रूपयांच्या जवळपास होता. एक महिन्यानंतरही तो 90 ते शंभरापर्यंत आहे. आखाती देशांत द्राक्ष पाठवताना फारशा तपासण्या नसतात. या देशात द्राक्षाचा रेसिड्यू तपासला जात नाही. पण युरोपियन देशात रेसिड्यू आणि द्राक्षातील शुगर लेव्हलची काटेकोर तपासणी केली जाते. 16 ते 17 पर्यंत शुगर असेल तरच युरोपियन देशात द्राक्ष निर्यात होते. शिवाय द्राक्षे तेथील बाजारपेठेत जाईपर्यंत टिकतात. परंतु यावर्षी थंडीचे प्रमाण जास्त असल्याने द्राक्षमण्यांची शुगर लेव्हल कमी आहे. त्यामुळे निर्यातीसाठी व्यापारी फिरत असूनही द्राक्ष मिळत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे यावर्षी निर्यातीसह स्थानिक बाजारपेठातील द्राक्षाचे दर तेजीत राहण्याची शक्यता आहे.
निर्यातक्षम वाणाकडे कल वाढला : कुंभार
तीन चार वर्षात द्राक्षशेतीवर ओढवलेल्या आस्मानी आणि सुलतानी संकटामुळे द्राक्षाचे क्षेत्र कमी झाले आहे. परंतु निर्यातक्षम द्राक्षाच्या नव्या वाणाकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. ऑरा 35, रेडग्लो, क्रिमसन सिडलेस यासारख्या व्हरायटी सुरू झाल्या आहेत. ऑरा 35 चे जिल्ह्यात 700 एकर क्षेत्र झाले आहे. या द्राक्षाचा दर 250 रूपये प्रतिकिलो टिकून आहे. तर क्रिमसन सिडलेसचा दर 150 च्या खाली आला नाही. त्यामुळे पारंपारिक वाणाकडील शेतकरी निर्यात क्षम द्राक्षाच्या वाणाकडे वळू लागला असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार यांनी दिली.
वाहतुकीचा प्रश्न सुटल्यास आणखी दर वाढतील
पनामा कालव्यातून वाहतुकीवेळी जहाजे अडवण्यात येत असल्याने बऱ्याचवेळा युरोपियन देशात जाण्यासाठी आफ्रिकेला वळसा घालून जावे लागते. त्यामुळे 28 ते 30 दिवसांत पोहोचणारी द्राक्षे 40 दिवसापर्यंत पुढे जातात. त्यामुळे काहीवेळा द्राक्षे बाजारात पोहोचण्यापूर्वीच खराब होतात. शिवाय वाहतूक खर्चही वाढतो. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो. या प्रश्नावर आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा सूरू आहे. या चर्चेतून मार्ग निघाल्यास द्राक्षनिर्यातीला आणखी चालना मिळेल असे सांगण्यात आले.