जमिनींना योग्य भाव देण्याची मागणी
धारवाड-बेळगाव रेल्वेमार्ग भूमिअधिग्रहण सुरूच ठेवल्यास रस्त्यावर उतरण्याचा शेतकऱ्यांचा इशारा
प्रतिनिधी/ बेळगाव
धारवाड-कित्तूर-बेळगाव दरम्यान 73 कि.मी. नूतन रेल्वेमार्ग करण्यात येणार आहे. यासाठी भूमिअधिग्रहण प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यासाठी जमिनींना भाव देण्यासाठी बैठकही घेण्यात आली होती. मात्र अपेक्षेनुसार भाव मिळत नसल्याने भूमिअधिग्रहण करण्यास विरोध करत आहोत. जर विरोध असतानाही सदर प्रक्रिया सुरूच ठेवल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा हिरेबागेवाडी, हुलीकट्टी व शेजारील गावांतील शेतकऱ्यांनी दिला. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना देण्यात आले.
कर्नाटक औद्योगिक विकास मंडळ व जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत एक. के. हुबळी येथे जमीन सल्लागार समितीच्या बैठकीत हिरेबागेवाडी येथील जमिनीस 45 लाख तर हुलीकट्टी व आसपासच्या गावातील जमिनींसाठी 35 लाख किंमत देण्याचे ठरविण्यात आले. मात्र हा दर कमी आहे. हिरेबागेवाडी व हुलीकट्टी ही दोन्ही गावे लागून आहेत. बेळगावपासून केवळ 18 तर सुवर्णसौधपासून 8 कि.मी. अंतरावर आहेत. या भागात अनेक दगडखाणी व रिअल इस्टेटही तेजीत असून येथील जमिनींचे दर वधारले आहेत.
हिरेबागेवाडीतून राष्ट्रीय महामार्ग 4 व राज्य महामार्ग जात असून येथे राणी चन्नम्मा विश्वविद्यालयही स्थालांतरित करण्यात येणार आहे. राज्य सरकारने हिरेबागेवाडीला नगरपंचायतीचा दर्जा दिला असून जमिनीचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे भविष्यात वाढता बाजारभाव लक्षात घेऊन जमिनीला योग्य दर द्यावा. तसेच शेतकरी व नागरिकांसाठी रस्ता आणि पाणी साठविण्यासाठी कालवे बांधण्यात यावेत. त्याचबरोबर कागदपत्रे देण्यापासून सूट व कोणत्याही अडचणींशिवाय शेतकऱ्यांना काम करण्याची मुभा देण्यात यावी. परिणामी सदर मागण्या मान्य न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला. यावेळी हिरेबागेवाडी, हुलीकट्टी भागातील शेतकरी उपस्थित होते.