बिष्णोईच्या भावाच्या प्रत्यार्पणाची मागणी
अमेरिकेत अटक : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येत हात असल्याचा आरोप
वृत्तसंस्था/वॉशिंग्टन
भारतात कारागृहात असलेला कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोई याचा भाऊ अनमोल बिष्णोई याला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर महाराष्ट्रातील राजकीय नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येत हात असल्याचा आरोप आहे. तो या प्रकरणासाठी भारताला हवा आहे. त्याला काहा दिवसांपूर्वी अमेरिकेच्या पोलिसांनी अटक केली असून त्याला सध्या त्या देशातील लोवा या प्रांतातील एका कारागृहात ठेवण्यात आले आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
अनमोल बिष्णोई हा कॅनडात वास्तव्यास होता. त्याचे नेहमी अमेरिकेत येणे जाणे होत होते. त्याचा मोठा भाऊ लॉरेन्स बिष्णोई हा अहमदाबाद येथील साबरमती मध्यवर्ती कारागृहात आहे. दोन्ही भावांचे गुन्हेगारी नेटवर्क असून लॉरेन्स बिष्णोई हा भारतात, तर अनमोल बिष्णोई हा आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करत होता, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. अमेरिकेने अद्याप अनमोल बिष्णोई याच्या अटकेसंदर्भात कोणतीही सविस्तर माहिती दिलेली नाही.
भारताला हवा असलेला गुन्हेगार
अनमोल बिष्णोई हा भारताला अनेक गुन्हेगारी प्रकरणांमध्ये हवा असलेला आरोपी आहे. सलमान खान यालाही धोका करण्याचा प्रयत्न त्याने केला होता, असाही आरोप आहे. त्याला अमेरिकेत अटक करण्यात आल्याचे वृत्त समोर येताच भारताने त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी अमेरिकेकडे नोंद केली आहे. भारताच्या राष्ट्रीय अन्वेषण प्राधिकरणाने त्याच्यावर 10 लाख रुपयांचे इनाम लावले आहे.
अमेरिकेचे मौन
त्याच्या अटकेसंदर्भात अमेरिकेच्या पोलिस विभागाने अधिकृतरित्या महिती दिलेली नाही. तथापि, या विभागाच्या वेबसाईटवर त्याला अटक केल्याची माहिती पोस्ट करण्यात आली आहे. त्याचे भारताला प्रत्यार्पण केले जाण्याचा विषय अमेरिकेच्या न्याय विभागाच्या कार्यकक्षेतील आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. भारतात तो, त्याचा भाऊ आणि त्यांच्या टोळीतील इतर लोक यांच्यावर अनेक एफआयआर सादर असून अनेकांना अटकही करण्यात आलेली आहे.