कर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याची मागणी
भीमसेना संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : जिल्ह्यामध्ये गेल्या आठ ते दहा दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार मिळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत कर्ज वितरण केलेल्या फायनान्स कंपनीकडून कर्जवसुलीसाठी ग्रामीण भागातील महिला संघांकडे तगादा लावला जात आहे. कर्जवसुली त्वरित थांबवावी व तीन महिन्यापर्यंत मुदत देण्यात यावी, अशी मागणी करत भीमसेना संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. जिल्ह्यातील खानापूर, सौंदत्ती, कित्तूर, बैलहोंगल, चिकोडी, गोकाक आदी तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दैनंदिन रोजगारावर चरितार्थ चालविणाऱ्या कुटुंबीयांना रोजगार मिळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत फायनान्स कंपन्यांकडून इतर संघांकडून कर्ज घेतलेल्या महिला संघांना कर्ज भरणे अशक्य ठरत आहे. असे असले तरी फायनान्स कंपन्यांकडून कर्ज वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. अर्वाच्च शब्दात शिवीगाळ केली जात आहे. कर्ज वसुलीला घाबरून अनेकजण आत्महत्येचा मार्ग अवलंबत आहेत.
प्रशासनाने फायनान्स कंपन्यांना कर्ज वसुलीपासून रोखावे
प्रशासनाने फायनान्स कंपन्यांना कर्ज वसुलीपासून रोखावे व कर्ज घेतलेल्या नागरिकांना तीन महिन्यापर्यंत मुदतवाढ द्यावी. पाऊस ओसरल्यानंतर नागरिकांना रोजगार मिळणे शक्य होणार आहे. त्यानंतर कर्ज भरणेही सोयीचे होणार आहे. यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी भीमसेनेकडून निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी संघटनेचे पदाधिकारी, कर्जदार आदी उपस्थित होते.