आगामी काळात विजेची मागणी वाढणार
इक्राने केले मत व्यक्त : 4 ते 4.5 टक्के वाढणार मागणी
वृत्तसंस्था/कोलकाता
आर्थिक वर्षातील आगामी काळात देशातील विजेची मागणी अधिक राहणार असल्याचा अंदाज रेटिंग एजन्सी इक्रा यांनी वर्तवला आहे. यंदा वेळेपूर्वीच मान्सून दाखल झाल्याने पहिल्या सहा महिन्यांमध्ये विजेची मागणी काहीशी कमीच दिसून आली. आर्थिक वर्ष 2026 च्या दरम्यान 4 ते 4.5 टक्के इतकी वाढ विजेच्या मागणीत दिसून येऊ शकते. आर्थिक वर्ष 2025 मध्ये देशाची एकूण वीज मागणी 1695 अब्ज युनिट इतकी राहिली आहे. इक्राचे उपाध्यक्ष आणि समूह प्रमुख अंकित जैन यांच्या मते, आर्थिक वर्ष 2026 च्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये विजेची मागणी केवळ एक टक्का इतकी वाढीव राहिली होती. वेळेपूर्वी दाखल झालेल्या मान्सूनमुळे असे झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. मान्सून आधीच दाखल झाल्यामुळे विजेची मागणी आपसूकच कमी झालेली पाहायला मिळाली. आता परिस्थितीमध्ये सुधारणा होत असून येणाऱ्या काळामध्ये विजेच्या मागणीमध्ये वाढ पाहायला मिळणार आहे.
कोळशाचा साठा पुरेसा
विजेच्या पुरवठ्यासाठी उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या कोळशाचा पुरेसा साठा असल्याचेही सांगितले जात आहे. 10 ऑक्टोबर 2025 पर्यंत वीज घरांपाशी 14 दिवसांचा आगाऊ कोळशाचा साठा असल्याचे सांगितले जात आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये समान अवधीतील ही स्थिती चांगली म्हणता येईल.