नूतन बसस्थानक लवकर सुरू करण्याची मागणी
उद्घाटन करूनही कार्यान्वित करण्याकडे कानाडोळा
बेळगाव : स्मार्ट सिटी योजनेंतर्गत कोट्यावधी रुपये खर्च करून सुसज्ज नूतन बसस्थानक निर्माण करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतरही बसस्थानक अद्याप सुरू न केल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. प्रवाशांना होणाऱ्या समस्यांची दखल घेऊन परिवहन मंडळाने लवकरात लवकर बसस्थानक सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मध्यवर्ती बसस्थानकाला लागून असलेल्या जागेत जुने बसस्थानक होते. येथे सुविधांविना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. मुलभूत सुविधांपासून प्रवाशांसह कर्मचारीही वंचित होते. जुने बसस्थानक जमीनदोस्त करून 2018 मध्ये नव्या बसस्थानकाचे काम सुरू करण्यात आले. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत कोट्यावधी रुपये खर्च करून अत्याधुनिक बसस्थानकाचे थाटात उद्घाटन झाले. मात्र अद्यापही बसस्थानक बंद अवस्थेत आहे.
सध्या सीबीटीचा काही भाग शहर व उपनगरातील बस वाहतुकीसाठी वापरण्यात येत आहे. यामध्ये 150 हून अधिक बसेस सेवा देत आहेत. दररोज तात्पुरती व्यवस्था करून बससेवा देण्यात येत आहे. मात्र या व्यवस्थेमध्ये मुलभूत सुविधा नसल्याने प्रवाशांना समस्या उद्भवत आहेत. तसेच परिसरात अस्वच्छताही पसरली असून पिण्याच्या पाण्याचीही कमतरता आहे. शहर व उपनगरात बससेवेचा हजारो प्रवासी लाभ घेत असतात. मात्र बससेवा पुरविताना मुलभूत सुविधा पुरविणेही आवश्यक आहे. प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी परिवहन विभागाने लवकरात लवकर नूतन बसस्थानक सुरू करणे आवश्यक आहे. उद्घाटन करूनही बसस्थानक का सुरू करण्यात आले नाही? असा प्रश्नही निर्माण होत आहे. प्रवाशांना सुसज्ज बसस्थानकातील सुविधा अनुभवण्यासाठी त्वरित बसस्थानक सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे.