वीज वितरणकडून डिपॉझिटच्या मागणीमुळे ग्राहक संतप्त
ग्राहक संघटनेच्या बैठकीत तीव्र पडसाद
सावंतवाडी । प्रतिनिधी
वीज वितरण कंपनीने ग्राहकांना अनामत रक्कम (डिपॉझिट) भरण्याची मागणी केल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या संदर्भात गुरुवारी येथील नगर परिषदेच्या पत्रकार कक्षाजवळील सभागृहात जिल्हा वीज ग्राहक संघटना आणि तालुका वीज ग्राहक संघटना यांनी आयोजित केलेल्या वीज ग्राहकांच्या बैठकीत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या.या बैठकीत जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष संजय लाड, जिल्हा समन्वयक नंदन वेंगुर्लेकर, दीपक पटेकर आणि बोर्डेकर व्यासपीठावर उपस्थित होते.यावेळी वीज ग्राहकांनी तीव्र नाराजी व्यक्त करताना सांगितले की, वीज वितरण कंपनीने ग्राहकांना अनामत रक्कम भरण्याबाबत बिले पाठवली आहेत. यापूर्वी डिपॉझिट भरलेले असताना पुन्हा डिपॉझिट भरण्याची नोटीस का बजावण्यात आली, असा सवाल त्यांनी केला. ही अन्यायकारक बाब असल्याचेही ग्राहकांनी स्पष्टपणे सांगितले.जिल्हा समन्वयक नंदन वेंगुर्लेकर यांनी ग्राहकांच्या तक्रारींची दखल घेत सांगितले की, ग्राहकांच्या या तक्रारी विज्ञान आयोगाचे व्यवस्थापन संचालक यांच्या निदर्शनास आणून देण्यात येतील आणि डिपॉझिटची रक्कम न घेण्याची विनंती केली जाईल.या बैठकीत वीज ग्राहकांनी अनेक समस्या मांडल्या. अनेक ठिकाणी ट्रान्सफॉर्मर नसल्यामुळे कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. तसेच, ट्रान्सफॉर्मरच्या बाजूला संरक्षक कंपाउंड नसल्यामुळे अपघात होण्याची भीती आहे, असेही ग्राहकांनी सांगितले. या संदर्भात लेखी तक्रार देण्यात यावी आणि अधीक्षक अभियंता यांचे लक्ष वेधण्यात येईल, असे आश्वासन नंदन वेंगुर्लेकर यांनी दिले.बैठकीत दिलीप वाडकर यांनी सावंतवाडी शहरातील वीज ग्राहकांना वाली नसल्याचे सांगितले. अनेक वीज खांब कमकुवत झाले आहेत, वीज वाहिन्या लोंबकळत आहेत, त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. शहरात पावसाळ्यापूर्वी झाडी तोडण्यात यावी आणि अनामत रकमेच्या मागणीवर फेरविचार करावा, अशी सूचना त्यांनी मांडली.हरिचंद्र मांजरेकर यांनी शहरातील लोंबकळणाऱ्या वीजवाहिन्या नागरिकांच्या जीवासाठी धोकादायक असल्याचे मत व्यक्त केले. तर, इन्सुलीचे उल्हास सावंत यांनी ग्रामीण भागातही वीज वाहिन्या लोंबकळत असून, त्यामुळे धोका निर्माण झाला असल्याचे सांगितले. 100 मीटरचे काम 50 मीटरमध्ये करावे, जेणेकरून हा धोका टाळता येईल. तसेच, ठिकठिकाणी वाढलेली झाडी पावसाळ्यापूर्वी तोडण्यात यावी, असे स्पष्ट केले. उठवणे येथे कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याची तक्रारही यावेळी करण्यात आली.यावेळी महेश खानोलकर, समीर शिंदे, विनायक राऊळ, संदीप सुखी, तुकाराम मापसेकर, शांताराम वारंग, आत्माराम स्वार, राजेश मोरजकर, मनोज घाटकर आदींनी आपल्या समस्या मांडल्या.जिल्हा समन्वयक नंदन वेंगुर्लेकर यांनी सांगितले की, वीज ग्राहकांच्या समस्यांबाबत 25 एप्रिल रोजी कार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर हे प्रश्न मांडले जातील आणि ते सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. ग्राहकांनी आपल्या लेखी तक्रारी संघटनेकडे द्याव्यात, जेणेकरून अधिकाऱ्यांना नेमकी समस्या सांगून ती सोडवता येईल. यापूर्वी आलेल्या लेखी तक्रारी संघटनेने सोडवल्या होत्या, त्यामुळे आताही ग्राहकांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारी द्याव्यात, असे आवाहन त्यांनी केले.संजय लाड यांनी सांगितले की, विविध ग्राहक संघटनांच्या माध्यमातून अनेक प्रश्न सोडवण्यात आले आहेत. स्मार्ट मीटरलाही वीज ग्राहक संघटनेने विरोध केला आहे. मात्र, काही लोकप्रतिनिधी स्मार्ट मीटर बसवण्याबाबत ठराव घेतात, ही चुकीची बाब आहे, असे त्यांनी नमूद केले.दीपक पटेकर यांनी सांगितले की, संघटनेमार्फत समस्या अधिकाऱ्यांसमोर ठेवल्या जातील आणि त्यानंतर त्यांच्याकडून येणाऱ्या उत्तराची माहिती ग्राहकांना दिली जाईल.