रायबागला आणखी एका इस्पितळाची मागणी
आमदार दुर्योधन ऐहोळे यांनी मांडला मुद्दा
बेळगाव : रायबाग तालुक्याला माता व शिशू इस्पितळ मंजूर करण्याची मागणी आमदार दुर्योधन ऐहोळे यांनी गुरुवारी विधानसभेत केली. मात्र, सध्या शंभर खाटांचे तालुका इस्पितळ कार्यरत असल्यामुळे स्वतंत्र माता व शिशू इस्पितळ देता येणार नाही, असे आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री दिनेश गुंडूराव यांनी सांगितले. गुरुवारी प्रश्नोत्तराच्या तासात दुर्योधन ऐहोळे यांच्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना रायबाग येथील शंभर खाटांच्या इस्पितळात दरमहा सरासरी 30 प्रसूती होतात. त्याही नैसर्गिक प्रसूती असतात. 2024-25 मध्ये एकही सिझेरियन झाले नाही. केंद्र सरकारच्या निकषांनुसार 70 टक्के रुग्णसंख्या असली पाहिजे. सध्या या इस्पितळात दाखल होणाऱ्या महिलांची संख्या 10 टक्के आहे. त्यामुळे माता व शिशू इस्पितळ सुरू करण्याची तरतूद नसल्याचे त्यांनी सांगितले. शंभर खाटांच्या इस्पितळात डॉक्टरांची कमतरता आहे, ही गोष्ट खरी आहे. स्त्राrरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, कान-नाक-घसा तज्ञांची कमतरता आहे. लवकरच दोन स्त्राrरोगतज्ञ, दोन भूलतज्ञ व दोन बालरोगतज्ञ शंभर खाटांच्या इस्पितळाला देणार असल्याचे दिनेश गुंडूराव यांनी सांगितले.