For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगाव-दिल्ली मार्गावर अतिरिक्त एक्स्प्रेसची मागणी

10:26 AM May 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेळगाव दिल्ली मार्गावर अतिरिक्त एक्स्प्रेसची मागणी
Advertisement

एकच रेल्वे धावत असल्याने प्रवाशांची गैरसोय

Advertisement

बेळगाव : बेळगाव-दिल्ली या मार्गावर केवळ एकच एक्स्प्रेस दैनंदिन धावते. बेळगाव-मिरज या भागातून दिल्लीला जाणाऱ्यांची संख्या मोठी असल्यामुळे पुढील महिनाभराचे बुकिंग फुल्ल असते. त्यातच वास्को-निजामुद्दीन एक्स्प्रेसचे स्लीपर डबे कमी केल्याने सर्वसामान्यांना बुकिंग मिळणेही कठीण झाले आहे. त्यामुळे बेळगाव-दिल्ली या मार्गावर आणखी एखादी एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे. वास्को-निजामुद्दीन (गोवा एक्स्प्रेस) सायंकाळी 7.45 वाजता बेळगावमधून दिल्लीच्या दिशेने निघते. पुण्याला जाण्यासाठी ही शेवटची रेल्वे असल्याने पुण्याच्या प्रवाशांचाही मोठा भरणा असतो. 34 तास 45 मिनिटांनी एक्स्प्रेस दिल्ली येथील हजरत निजामुद्दीन रेल्वेस्थानकावर पोहोचते. बेळगावमध्ये मराठा लाईट इन्फंट्रीचे रेजिमेंटल सेंटर, एअर फोर्सचे एअरमन ट्रेनिंग स्कूल, कोब्रा ट्रेनिंग स्कूल यासह अनेक केंद्रीय विभागांची कार्यालये असल्यामुळे नागरिकांची ये-जा असते. जम्मू-काश्मीर, दिल्ली येथे कार्यरत असलेले जवान गोवा एक्स्प्रेसने दिल्लीपर्यंत प्रवास करतात. वर्षभरापूर्वी गोवा एक्स्प्रेसला नवीन एलएचबी आलिशान कोच बसविण्यात आले. परंतु, आलिशान कोच बसविताना स्लीपर डब्यांची संख्या कमी करून एसी डब्यांची संख्या वाढविली. स्लीपर कोचसाठी बेळगाव ते दिल्ली 790 रुपये तिकीट दर आहे तर एसीसाठी (3ई) 1955 रुपये तिकीट दर आहे. स्लीपर कोच फुल्ल झाल्यास नागरिकांना नाईलाजास्तव अधिकचे पैसे खर्च करून एसी कोचसाठी बुकिंग करावे लागत आहे. यापूर्वी आठ ते नऊ स्लीपर कोच गोवा एक्स्प्रेसला देण्यात आले होते. आता ही संख्या दोनवर आणली आहे. यामुळे वर्षभरापासून प्रवाशांचे हाल होत आहेत. जनरल डबा फुल्ल झाल्यानंतर तेथील प्रवासी स्लीपर डब्यांमध्ये शिरत आहेत. यामुळे बऱ्याचवेळा वादावादीचे प्रकारही घडत आहेत. रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे याबाबत अनेकवेळा तक्रार करूनही त्यांच्याकडून योग्य असा प्रतिसाद मिळालेला नाही.

हुबळी-निजामुद्दीन मार्गावर एक्स्प्रेस सुरू करा

Advertisement

गोवा एक्स्प्रेस व्यतिरिक्त बेंगळूर-निजामुद्दीन मार्गावर साप्ताहिक रेल्वे आहेत. परंतु, या रेल्वे बेंगळूरमधून सुटत असल्याने त्यांचे बुकिंग नेहमीच फुल्ल असते. यामुळे बेळगावच्या प्रवाशांना बुकिंग मिळताना अडचणी निर्माण होतात. त्यामुळे हुबळी-निजामुद्दीन मार्गावर रात्री उशिरा एक्स्प्रेस सुरू करावी. जेणेकरून बेळगावहून पुणे व तेथून दिल्लीपर्यंत प्रवास करणे सोयीचे ठरेल.

Advertisement
Tags :

.