इंगळी घटनेतील संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी
बेळगाव : हुक्केरी तालुक्यातील इंगळी येथे गोरक्षकांना झाडाला बांधून मारहाण करण्यात आली. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली. मात्र या घटनेत अनेक लोक सहभागी असून उर्वरितांना त्वरित अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कामधेनू अय्यप्पा सामाजिक सेवा संस्थेच्यावतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. इंगळी येथे गोशाळा असून तेथे अनेक गायींचे संगोपन करण्यात येते. मात्र काही दिवसांपूर्वी काही जण गो-शाळेतील गायी पळवून घेऊन जात होते. याला हिंदू बांधवांनी विरोध केला असता त्यांना झाडाला बांधून घालण्यात आले. यानंतर त्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली. या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले असून याचा आम्ही निषेध करतो. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेमागे अनेकांचा सहभाग असून त्यांनाही त्वरित अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी निलेश हिरेहोळी, आनंद देवडीगा, आनंद नावले, महादेव यळवार, मारुती कोळी यांच्यासह सदस्य उपस्थित होते.