नेपाळमध्ये हिंदू राष्ट्राच्या मागणीला जोर
राजेशाही पुन्हा लागू करण्याची जोरदार मागणी : पूर्वाश्रमीच्या राजाला देशात वाढते समर्थन
वृत्तसंस्था/ काठमांडू
नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये पुन्हा एकदा हिंदू राष्ट्र घोषित करण्याची मागणी तीव्र होऊ लागली आहे. त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर नेपाळचे माजी राजे ज्ञानेंद्र शाह यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी झाली. या जमावाने देशात पुन्हा राजेशाही लागू करण्याची मागणी करत पूर्वाश्रमीच्या राजाचे स्वागत केले आहे. यावेळी लोकांनी ‘नारायणहिटी खाल गर, हाम्रो राजा आउंदै छन’ म्हणजेच ‘नारायणहिती (राजाचा महाल) खाली करा, आमचा राजा येतोय’ अशा घोषणा दिल्या आहेत. पूर्वाश्रमीचे राजे ज्ञानेंद्र शाह हे नेपाळचे पर्यटनस्थळ पोखरा येथील 2 महिन्यांच्या वास्तव्यानंतर काठमांडूत परतले आहेत. ज्ञानेंद्र शाह हे देशाच्या राजकारणात परतू इच्छित असल्याची चर्चा नेपाळमध्ये सुरू आहे. याकरता ते मोठी तयारी करत असल्याचे मानले जात आहे. पोखरा प्रवासादरम्यान ज्ञानेंद्र शाह यांनी अनेक मंदिरे अन् तीर्थस्थळांचे दौरे केले आणि जनतेचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
16 वर्षांपूर्वी नेपाळ हे एकमेव हिंदू राष्ट्र होते. 2008 पर्यंत ज्ञानेंद्र शाह हे नेपाळचे राजे होत. परंतु माओवाद्यांचा हिंसाचार आणि कथित डाव्या क्रांतिनंतर नेपाळमध्ये सत्तापरिवर्तन झाले आणि ज्ञानेंद्र शाह यांना सिंहासन सोडावे लागले होते. आता नेपाळमध्ये राजेशाहीचे समर्थक शासनाच्या राजेशाही व्यवस्थेच्या वापसीची मागणी करत आहेत.
आरपीपीचा पाठिंबा
नेपाळमध्ये शासन व्यवस्थेत परिवर्तनाच्या मागणीकरता एक मोठा राजकीय पक्ष ज्ञानेंद्र शाह यांना समर्थन देत आहे. राष्ट्रीय प्रजातांत्रिक पार्टीने स्वत:च्या स्थापनेपासूनच नेपाळमध्ये हिंदू राष्ट्र आणि राजेशाहीचे जोरदार समर्थन केले आहे. आरपीपी नेपाळसाठी हिंदू राष्ट्राचा दर्जा आणि राजेशाहीला परस्परांच्या पूरक मानते. 2008 मध्ये आरपीपीने 575 जागा असलेल्या संसदेच्या संविधान सभेत 8 जागा प्राप्त केल्या होत्या. 2013 च्या निवडणुकीत हा पक्ष 13 जागा मिळविण्यास यशस्वी ठरला. तर 2017 मध्ये हा आकडा 1 पर्यंत खाली आला. परंतु 2022 च्या निवडणुकीत पक्षाने 14 जागा मिळवित लक्ष वेधून घेतले. नेपाळमध्ये सध्या जी व्यवस्था लागू आहे, त्यापासून लोकांचा मोहभंग झाला आहे, आता लोक जुने दिवस आठवू लागले आहेत. 2008 मध्ये सत्ताबदल झाल्यापासून 17 वर्षांनंतरही आता राजे ज्ञानेंद्र शाह हे नेपाळमध्ये खलनायक नाहीत, असा दावा आरपीपीचे उपाध्यक्ष रविंद्र मिश्रा यांनी केला आहे. पूर्वाश्रमीचे राजे ज्ञानेंद्र शाह यांचे काठमांडूत आरपीपीच्या वरिष्ठ नेत्यांनी स्वागत केले आहे. विमानतळापासून त्यांना निवासस्थानापर्यंत जाण्यासाठी अडीच तास लागले. यादरम्यान मोठ्या रॅलीसारखी स्थिती होती. लोकांनी राजाचे जोरदार स्वागत करत घोषणा दिल्या.
2008 नंतर 13 वेळा सत्तांतर
2008 साली नेपाळमध्ये लोकशाही लागू झाल्यापासून भारताच्या या शेजारी देशात सातत्याने राजकीय अस्थिरता राहिली आहे. 2008 पासून आतापर्यंत तेथे 13 वेळा सत्तांतर झाले आहे. नेपाळने 240 वर्षे जुन्या राजेशाहीला बदलण्यासाठी अनेक गोष्टी सोडून दिल्या. आंदोलनामुळे पर्यटन आधारित या देशाची अर्थव्यवस्था ठप्प झाली. तसेच डाव्या संघटनांच्या हिंसाचारात 16 हजार लोक मारले गेले. 2022 च्या जनगणनेनुसार हिमालयाच्या कुशीत असलेल्या नेपाळची लोकसंख्या सुमारे 3.5 कोटी आहे आणि येथील 81.19 टक्के जनता हिंदू आहे.
राजेशाही परतणार का?
नेपाळमध्ये ‘राजा आणा, देश वाचवा’ अशा घोषणा देण्यात येत असल्या तरीही संसदीय समर्थनाशिवाय असे घडणे अशक्य आहे. नेपाळमधील प्रमुख राजकीय पक्ष नेपाळी काँग्रेस, कम्युनिस्ट पक्ष हे धर्मनिरपेक्षता आणि लोकशाहीचे समर्थन करतात. घटनात्मक स्वरुपात राजेशाही लागू करण्यासाठी व्यापक घटनादुरुस्ती आणि जनसमर्थनाची गरज भासणार आहे, जे सद्यस्थितीत अवघड असल्याचे मानले जाते.
पंतप्रधान शर्मा ओलींचे आव्हान
नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी पूर्वाश्रमीचे राजे ज्ञानेंद्र शाह यांना मुख्य प्रवाहातील राजकारणात येण्याचे आव्हान दिले आहे. ज्ञानेंद्र शाह हे सौहार्द बिघडवित आहेत. घटना, कायदा, लोकशाही, व्यवस्थेविषयी ते काहीच बोलत नाहीत. केवळ मला साथ द्या, मी येईन आणि देश वाचवेन असे म्हणत आहेत. अशाप्रकारची कृती अस्थिरता निर्माण करणारी ठरेल. ज्ञानेंद्र शाह यांच्याकडून होणाऱ्या हालचाली या देशाला अराजकतेच्या दरीत लोटत असल्याचा आरोप ओली यांनी केला आहे.