चिपळुणात १६ हजार पाठ्यपुस्तकाची मागणी
चिपळूण :
समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मोफत पाठ्यपुस्तकांसाठी चिपळुणातील शिक्षण विभागाने १६ हजार पुस्तकांची शासनाकडे मागणी केली आहे. यात मराठीप्रमाणे उर्दू माध्यमाचाही समावेश आहे. नवे शैक्षणिक सत्र सुरू होण्यास अजून काही दिवसाचा अवधी असला तरी मे अखेरीस किंवा जूनच्या प्रारंभी ही पुस्तके शिक्षण विभागात दाखल होणार आहेत.
पहिली ते आठवीच्या शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, खासगी अनुदानित शाळांमध्ये शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तक योजना राबवण्यात येते. अजूनही नवे शैक्षणिक सत्र सुरू होण्यास काही दिवसाचा अवधी असला तरी चिपळूण पंचायत समितीच्या शिक्षण विभागातून मोफत पाठ्यपुस्तकाची शासनाकडून मागणी करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने मराठी माध्यमामध्ये पहिली ते तिसरीसाठी १,७२४, चौथी-१,८१३, पाचवी-२,२४९, सहावी-२,००५, सातवी-२,१२९, आठवी-२,३१८ तर उर्दू माध्यमामध्ये पहिली ते तिसरी-८७, चौथी-१२१, पाचवी-१२५, सहावी-११५, सातवी-१११ तर आठवीसाठी १२२ अशा १६ हजार ५४१ मोफत पाठ्यपुस्तकाचा समावेश आहे. ही पाठ्यपुस्तके मे महिन्याच्या अखेरीस किंवा जून महिन्याच्या प्रारंभीस शिक्षण विभागाकडे प्राप्त होणार आहेत. त्यानंतर त्याचे प्रत्येक शाळास्तरावर वाटप केले जाणार आहे. नवे शैक्षणिक सत्र होण्याच्या पहिल्याच दिवशी ही पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांच्या हातात मिळावी, यादृष्टीने शिक्षण विभागाचे आतापासून नियोजन सुरु आहे. त्यानुसार शाळांसह विद्यार्थ्यांच्या याद्या अद्ययावत करण्यासाठीच्या कामाला शिक्षण विभाग लागला आहे.
- इयत्ता पहिलीच्या अभ्यासक्रमात बदल
यंदाच्या नव्या शैक्षणिक सत्रामध्ये इयत्ता पहिलीचा अभ्यासक्रमात बदल झाला आहे. अनेक वर्षानंतर हा बदल झालेला असून त्यात सीबीएसई पॅटर्न अवलंबण्यात आला आहे.