For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जीडीपीदर 6.5 टक्के ते 6.8टक्के राहण्याचा डेलॉईटचा अंदाज

06:57 AM Jul 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
जीडीपीदर 6 5 टक्के ते 6 8टक्के राहण्याचा डेलॉईटचा अंदाज
Advertisement

2026-27 आर्थिक वर्षाचा अंदाज

Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

चालु आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये भारताचा विकास दर 6.5 टक्के ते 6.8 टक्के इतका राहणार असल्याचा अंदाज डेलॉईट इंडिया यांनी नुकताच व्यक्त केला आहे. ताज्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

Advertisement

आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीमध्ये विकासाचा वेग काहीसा मंद राहू शकतो. मात्र दुसऱ्या सहामाहीत सण, उत्सवामुळे मागणी वाढीव राहू शकते. त्याचबरोबर महागाई दरातही नरमाई येण्याची शक्यता त्यांनी वर्तविली. सोबत जागतिक परिस्थितीतही सुधारणा होऊन अर्थव्यवस्थेला गती प्राप्त होऊ शकते, असेही डेलॉईटच्या अहवालामध्ये म्हटले गेले आहे. 2026 च्या वर्षाची आर्थिक सुरुवात चांगली झाली आहे. परंतु पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि जागतिक संकटात्मक घटनांमुळे आर्थिक स्थितीवर प्रभाव पडला आहे. समुद्रीमार्गाने होणारी वाहतूक संथ झाल्याने किंमतीत चढ-उतार पहायला मिळाले. यातून गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. याचा थेट परिणाम व्यापार घट व रुपयाच्या चलन दरावर पहायला मिळाला.

रिझर्व्ह बँकेचा अंदाज

भारतीय रिझर्व्ह बँकेने अलिकडच्या ताज्या अहवालात चालू आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी दर 6.6 टक्के राहणार असल्याचा अंदाज वर्तविला होता. रिझर्व्ह बँकेने या आधी जीडीपी दर 6.9 टक्के राहणार असल्याचे वर्तविले होते. पश्चिम आशियातील तणावाचे परिणाम देशात दिसण्याच्या कारणास्तव रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षाकरिता जीडीपी दरात घसरण अंदाजित केली आहे.

काय म्हणाल्या मजुमदार

डेलॉईट इंडियाच्या अर्थतज्ञ रुमकी मजुमदार म्हणाल्या, जागतिक आर्थिक परिस्थिती आधीच्या तुलनेत अधिक अनिश्चित झाली आहे. भूराजकीय घटनांच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने काही महत्त्वाची पावले उचलून जोखीम कमी करण्याचा प्रयत्न केला. परंतु मान्सून संदर्भातील अनिश्चितचे वातावरण यामुळे यंदा कृषी उत्पादनात घट होण्याची भीतीदेखील आहे. त्यामुळे कृषी उत्पादनांच्या किंमती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Advertisement
Tags :

.