डेलिव्हरी करणार इकॉम एक्स्पे्रसचे अधिग्रहण
1460 कोटींना होणार व्यवहार : 6 महिन्यात प्रक्रिया होणार पूर्ण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लॉजिस्टिक क्षेत्रातील दिग्गज कंपनी डेलिव्हरीने आपली प्रतिस्पर्धी कंपनी इकॉम एक्स्प्रेसला खरेदी करण्याचा विचार चालवला आहे. सदरच्या खरेदीचा व्यवहार हा 1460 कोटी रुपयांना होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. खरेदी कराराची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर इकॉम एक्स्प्रेस डेलिव्हरीची सहाय्यक कंपनी बनणार आहे. कंपनीने या संदर्भातली माहिती शेअर बाजाराला दिली आहे. संचालक मंडळाने इ-कॉम एक्स्प्रेस आणि त्यांच्या समभागधारकांसोबत समभाग खरेदी करारा संदर्भात मंजुरी दिली असल्याचे समजते.
काय म्हणाले
डेलिव्हरीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच सीईओ साहिल बरुआ म्हणाले, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये लॉजिस्टिक क्षेत्राचे योगदान महत्त्वाचे असणार असून यातील होणारा खर्च कमी करण्यासोबतच या क्षेत्राला भविष्यात गती देण्यासाठी आवश्यक त्या सुधारणा करण्याची गरज आहे. या अनुषंगानेच कंपनीने प्रतिस्पर्धी कंपनी इ-कॉम एक्स्प्रेस यांचे अधिग्रहण करण्याचे निश्चित केले आहे. या माध्यमातून कंपनी एकत्रितरित्या ग्राहकांना चांगल्यात चांगली सेवा देण्यासाठी आगामी काळात प्रयत्न करणार आहे.
कंपनीची उलाढाल
मिळालेल्या माहितीनुसार सदरच्या अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी जवळपास सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. इ कॉम एक्स्प्रेस या कंपनीची स्थापना ऑगस्ट 2012 मध्ये झाली होती. गुरुग्राम, हरियाणा येथे कंपनीचे मुख्यालय असून तंत्रज्ञानाने युक्त अशी ही लॉजिस्टिक सेवा देणारी कंपनी आहे.