दिल्लीचे आव्हान
आम आदमी पक्षाची 13 वर्षांची सत्ता उलथवून दिल्लीत सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून कुणाला पसंती मिळणार, याबाबतचे कुतूहल अद्यापही कायमच आहे. विधानसभेत 70 पैकी 48 जागा मिळवून भाजपाने 26 वर्षांनतर दिल्लीच्या राजकारणात एन्ट्री केली. तर अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला केवळ 22 जागांवर समाधान मानावे लागले. मात्र, निकाल जाहीर होऊन दहा दिवस झाले, तरी भाजपकडून अद्याप मुख्यमंत्रिपदाचे नाव निश्चित झालेले नाही. त्यावरून ‘आप’नेही भाजपकडे सरकार चालविण्यासाठी सक्षम चेहरा नसल्याची टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष असेल. या बैठकीत विधिमंडळ पक्षनेत्याची निवड होणार असून, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, हे कळू शकेल. अर्थात यात प्रवेश वर्मा यांचे नाव सर्वाधिक आघाडीवर असल्याचे दिसून येते. वर्मा हे दिल्लीतील पंजाब आणि जाट समुदायाचा प्रमुख चेहरा म्हणून ओळखले जातात. त्यांना कौटुंबिक राजकीय वारसाही लाभला असून, त्यांचे वडील साहिबसिंग वर्मा हे दिल्लीचे मुख्यमंत्री होते. एमबीएपर्यंत शिक्षण घेतलेले प्रवेश वर्मा हे एक उच्चशिक्षित राजकारणी म्हणून परिचित आहेत. यापूर्वी आमदार आणि खासदार म्हणूनही त्यांनी चोख जबाबदारी सांभाळली आहे. विधानसभा निवडणुकीत दस्तुरखुद्द अरविंद केजरीवाल यांचा पराभव करून जवळपास चार ते साडेचार हजार मतांनी ते निवडून आले आहेत. त्यांचा एकूणच राजकीय अनुभव पाहता त्यांच्याकडे सीएमपदाची जबाबदारी सोपविली जाऊ शकते. किंबहुना, वर्मा यांचा लौकिक वादग्रस्त राजकारणी असा राहिला आहे. अनेकदा आपल्या वादग्रस्त विधानांनी त्यांनी पक्षाला अडचणीत आणले आहे. याशिवाय दिल्लीतील सामाजिक समीकरणेही वर्मा यांना अनुकूल दिसत नाहीत. त्यामुळे त्यांच्या नावावरच शिक्कामोर्तब होईल, असे छातीठोकपणे सांगता येत नाही. दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष विजेंद्र गुप्ता हेदेखील मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जातात. विशेष म्हणजे आम आदमी पक्षाच्या लाटेतही गुप्ता सातत्याने विजयी झाले आहेत. मागच्या तीन टर्म विजेंद्र गुप्ता निवडून आले असून, आपशी दोन हात करून भाजपचा झेंडा फडकवत ठेवण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. याशिवाय गुप्ता यांना प्रशासनाचा चांगला अनुभव आहे. हे बघता त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली, तरी आश्चर्य मानून घ्यायचे कारण नाही. सतीश उपाध्याय हेही भाजपमधील एक बडे नाव. कणखर नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. भाजपच्या अनेक प्रमुख पदांवर त्यांनी काम केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशीही त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. पक्षाचा प्रमुख ब्राम्हण चेहरा म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. मध्य प्रदेश, भाजपचे सहप्रभारी म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. या बाबी लक्षात घेता त्यांचे नावही रेसमध्ये दिसते. आशीष सूद यांचे नावही चर्चेत असून, पक्षाचा पंजाबी चेहरा म्हणून ते प्रसिद्ध आहेत. पक्षाचे प्रदेश महासचिव, गोवा, जम्मू काश्मीरचे सहप्रभारी यांसारख्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. प्रशासनाचा उत्तम अनुभव असलेल्या सूद यांचे केंद्रीय नेतृत्वाशी चांगले संबंध आहेत. हा त्यांच्याकरिता प्लस पॉईंट ठरू शकतो. जितेंद्र महाजन हेही शर्यतीत दिसतात. स्वच्छ प्रतिमा, ही त्यांची जमेची बाजू होय. रोहतासनगरमधून तीन वेळा जिंकलेल्या महाजन यांचा आजूबाजूच्या मतदारसंघांवरही चांगला प्रभाव असल्याचे दिसून येते. याशिवाय आरएसएसशी त्यांचीही जवळीक असल्याने त्यांनाही संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांच्याशिवाय रवींद्र इंद्रराज सिंह, शिखा राय, राजकुमार भाटिया यांचीही नावे चर्चेत आहेत. भाजपने राजस्थान, हरियाणा, मध्य प्रदेश, ओडिशा आणि छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री नेमताना प्रस्थापित नावे बाजूला सारण्याचे धारिष्ट्या दाखवले. त्यामुळे दिल्लीतही हाच पॅटर्न राबविला जाणार का, याबाबत औत्सुक्य असेल. तब्बल अडीच दशकांनंतर दिल्ली पादाक्रांत करणे भाजपाला शक्य झाले आहे. हे बघता मुख्यमंत्री निवडताना विशेष दक्षता घेतली जात असल्याचे दिसून येते. विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला असला, तरी ते सहजासहजी हार मानणाऱ्यातील नेते नाहीत. पुढची पाच वर्षे निश्चितपणे भाजपाला त्यांच्याशी कडवा सामना करावा लागू शकतो. या साऱ्याचा विचार करूनच मुख्यमंत्रिपदाचे नाव निश्चित केले जाण्याची शक्यता आहे. 20 फेब्रुवारी रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर शपथविधी होणार असून, त्याची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. शपथविधीची सर्व तयारी पक्षाचे महासचिव विनोद तावडे आणि तऊण चूग यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि इतर नेते उपस्थित असतील. दिल्ली जिंकण्यात पक्षाने यश मिळविल्याने हा शपथविधी भव्यदिव्य पद्धतीने आणि उत्साहात पार पडणार, हे वेगळे सांगायला नको. असे असले, तरी नवे मुख्यमंत्री आणि भाजपापुढची आव्हाने सोपी नसतील. दिल्लीत हवा, पाणी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर आहे. देशाच्या राजधानीला नवे रूप देण्याकरिता भाजप नेतृत्वाला ठोस पावले उचलावी लागतील. पेंद्रात भाजप आणि दिल्लीत केंद्रशासित प्रदेशात आप या सत्तेतील विभागणीमुळे मागची 13 वर्षे सातत्याने दिल्लीकरांना संघर्षच अनुभवायला मिळाला. दोन सरकारमधील वादांचा विकासकामांवरही परिणाम झाल्याचे दिसून आले. परंतु, दोन्ही ठिकाणी भाजपाची निर्विवाद सत्ता असल्यामुळे आता तरी दिल्लीच्या विकासातील स्पीडब्रेकर दूर झाले पाहिजेत. त्यादृष्टीने केंद्रीय नेतृत्वाने आणि दिल्लीतील नेतृत्वाने हातात हात घालून काम करणे अपेक्षित असेल. 25 वर्षांपूर्वी दिल्लीकरांनी भाजपला काम करण्याची संधी दिली होती. मात्र, या काळात अपेक्षित काम न झाल्याचा इतिहास आहे. हे बघता या खेपेला व्हिजन ठेऊनच भाजप सरकारला काम करावे लागेल. मोदी आणि शहा त्यादृष्टीने सूत्रे हलवतील, हे नक्की.