नेतृत्व कोणी करावे, यावर दिल्लीत निर्णय होईल!
मंत्री सतीश जारकीहोळी यांचे स्पष्टीकरण
प्रतिनिधी/ बेंगळूर
सिद्धरामय्या यांच्या नेतृत्त्वाखाली पुढील निवडणुकांना सामोरे जायचे की काही, याविषयी दिल्लीतील नेते निर्णय घेतील. कोणी नेतृत्व करावे, कोण सारथी हे दिल्लीतच ठरणार आहे, असे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. धारवाड येथे पत्रकारांशी ते बोलत होते. भाजपने कर्नाटकातील गॅरंटी योजनांवर टीका केली होती. आता दिल्लीत तेच आमचे अनुकरण करत आहेत. महाराष्ट्रातही हेच पेले आहे. याविषयी प्रल्हाद जोशींनाच विचारणा केली पाहिजे, अशी टिप्पणीही सतीश जारकीहोळी यांनी केली.
सरकारला अडीच वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री बदलणार का, यावर प्रतिक्रिया देताना मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले, मला ठाऊक नाही. याविषयी दिल्लीतील नेत्यांनाच विचारले पाहिजे. सध्या दलित मुख्यमंत्रिपदाचा मुद्दा उपस्थित झालेला नाही. मी मुख्यमंत्री व्हावे, असे चाहते सांगत आहेत. प्रत्येकाचे चाहते असतात. माझ्या चाहते मला मुख्यमंत्री बनवावे, अशी इच्छा व्यक्त करत आहेत, असेही त्यांनी सांगितले. मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल चर्चा झालेली नाही. अनेक आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. पण कधी मंत्रिमंडळ विस्तार होईल हे माहीत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हिडकलचे पाणी धारवाडला नेण्याच्या मुद्द्यावर सरकार निर्णय घेईल!
हिडकल जलाशयातून धारवाडला पाणी पुरवठा करण्याच्या मुद्द्यावर ते म्हणाले, याबाबत सरकार निर्णय घेईल. हा विविध खात्यांशी संबंधित मुद्दा आहे. सरकार यावर बेंगळूरमध्ये निर्णय घेईल. पाण्याचा मार्ग बदलला जात आहे की नाही, याविषयी मला माहीत नाही. पण, धारवाडला पाणी नेण्याच्या विषयावर चर्चा सुरु असल्याचे ठाऊक आहे. सरकारनेच यावर प्रकाशझोत टाकावा, असेही ते म्हणाले.